महात्मा गांधी विद्यालयामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
बोर्डाच्या परिक्षेसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना लाभले तज्ञांचे मार्गदर्शन
राजगुरुनगर (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगरमधील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाच्या वतीने, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विषय तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत डॉ. स्वाती ताडफळे (मराठी), ऋचा वैद्य (संस्कृत), डॉ. शैला ललवाणी (हिंदी), डॉ. श्रुती चौधरी (इंग्रजी), डॉ. जयश्री अत्रे (गणित), डॉ. सुलभा विधाते (विज्ञान), प्रा. शिवानी लिमये (इतिहास), प्रा.अतुल कुलकर्णी (भूगोल), विजय कचरे (व्यवसाय मार्गदर्शन) प्रा. गणेश हुरसाळे (उत्तरपत्रिका लेखन : तंत्र व मंत्र) या तज्ञांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी यशाचा मंत्र सांगितला.
परीक्षेला सामोरे जाताना सर्व भाषा विषय, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी ‘उत्तरपत्रिका लेखन कौशल्य : तंत्र व मंत्र’ याविषयी या कार्यशाळेत ज्ञानज्योत अकॅडमीचे संचालक प्रा. गणेश हुरसाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता दहावीची लढाई जिंकण्यासाठी, केवळ अभ्यास करणे पुरेसे नसून, झालेला अभ्यास उत्तरपत्रिकेत व्यवस्थित, नेमकेपणाने मांडता येणे महत्वाचे आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जाणून घेणे, प्रश्नांचा अर्थ समजून घेणे, वेळेचे नियोजन करणे व कौशल्यपूर्वक उत्तराची मांडणी करणे ही चतुःसूत्री वापरल्यास, प्रभावी उत्तरपत्रिका लिहिता येईल, असे प्रतिपादन प्रा.गणेश हुरसाळे यांनी यावेळी केले.
प्रा. हुरसाळे यांनी उत्तरपत्रिका लिहीत असताना होणाऱ्या चुका कशा टाळायच्या, उत्तरपत्रिकेचे सादरीकरण उत्तम कसे बनवायचे आणि अधिकाधिक गुण कसे मिळवायचे, त्याप्रमाणे परीक्षेपूर्वी योग्य पूर्वतयारी कशी करावी, मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांचा सुयोग्य समतोल कसा राखावा याविषयी काही क्लृप्त्या विद्यार्थ्यांना पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगितल्या.
दहावीच्या विद्यार्थ्यांना बालभारती व एस. एस. सी बोर्डाच्या विषयतज्ञ मार्गदर्शकांच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा व विषयाचे सखोल ज्ञान मिळावे, हा एकमेव हेतू या कार्यशाळेचा आहे, असे मत विद्यालयाचे प्राचार्य सुनील जाधव यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचे संयोजन व्याख्यानमाला व विद्यार्थी समुपदेशन विभाग प्रमुख लतीफ शाह यांनी केले. अर्चना गोडसे, नितीन वरकड, सचिन सांडभोर, अजय रोकडे, किसन गोपाळे यांनी सहकार्य केले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES