गाय-वासरू पूजनाने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला प्रारंभ
च-होली खुर्द येथे ‘साहेब केसरी 2023’चा थरार : ‘फाइव्ह स्टार’ नियोजन झाल्याची बैलगाडा मालक, शौकीनांकडून दाद
च-होली खुर्द (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । बैलगाडा शौकीन आणि मालकांसाठी रोमांचकारी ठरणा-या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या थरारक बैलगाडा शर्यतीला बुधवारपासून (दि. १३ डिसेंबर) प्रारंभ झाला. शर्यतीचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारे गोधन (गाय आणि वासरू) पूजनाने या शर्यतीला सुरवात झाली, ही अनोखी परंपरा बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील अगळीवेगळी ठरली.
खेड तालुक्यातील च-होली खुर्द येथे मी सेवेकरी सोशल फाउंडेशन आणि केळगाव-च-होली खुर्द-आळंदी ग्रामस्थ आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक-अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साहेब केसरी 2023’ बैलगाडा शर्यत बैलगाडा शौकीन आणि मालकांसाठी आकर्षण ठरत आहे.
च-होली गावच्या बैलगाडा घाटात ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होत आहे. स्पर्धेमध्ये गाडामालक स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांची मेजवानी ठरली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाला स्कॉर्पिओ, दुस-या क्रमांकाला बोलेरो, तिस-या क्रमांकाला छोटा हत्ती, चौथ्या क्रमांकाला ट्रॅक्टर, तर पाचव्या क्रमांकाला बुलेट बाईक अशी बक्षिसांची खैरात आहे. एवढंच नाही तर पहिल्यात पहिला येणा-या प्रत्येक गाडामालकाला एक टू-व्हिलरच बक्षिसही आहे.
शर्यतीसाठी ठेवण्यात आलेल्या या आकर्षक बक्षिसांमुळे सुमारे दोन हजारांहून अधिक गाडामालकांनी शर्यतीमध्ये सहभाग नोंदविला. परंतु शासन नियमांच्या बंधनांमुळे आयोजकांना त्यातील केवळ पाचशे ते सहाशे गाडामालकांना या स्पर्धेत संधी देता आली. त्याबद्दल शर्यतीचे मुख्य संयोजक आणि मी सेवेकरी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच गाडामालकांना टोकनसोबत त्यांचा येण्याजाण्यासाठीचा खर्च आयोजकांकडून देण्यात येत असल्याचे सुधीर मुंगसे यांनी स्पष्ट करत ते पुढे म्हणाले की, बैलगाडा शर्यत पहायला आलेल्या शैकिन, प्रेक्षकांसाठी जेवनाची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय मदतीसाठी ‘मी सेवेकरी फाउंडेशनचे स्वयंसेवक घाटात सगळीकडे उपस्थित आहेत. चोरी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी घाट परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. स्पर्धेच्या नियोजनात काही उणीव भासू नये याकरिता ‘डिजिटल घड्याळ’ ठळकपणे दिसत आहे. या स्पर्धेचे समाज माध्यमातून ‘लाइव्ह प्रक्षेपण’ही सुरू ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
योग्य नियोजनामुळे गाडामालक आणि बैलगाडा शौकीन समाधान व्यक्त करीत आहेत. रविवारी (दि. 17 डिसेंबर) या शर्यतीची सांगता होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या शर्यतीचे बक्षिस वितरण होणार असल्याचेही मुख्य संयोजक सुधीर मुंगसे यांनी स्पष्ट केले.
“शासन नियमांमुळे आम्हाला सगळ्या बैलगाडामालकांना संधी देता आली नाही त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो.”
– सुधीर मुंगसे, (मुख्य संयोजक)
“गोवंश आणि लाल मातीतील खेळ टिकावा यासाठी या शर्यतीचे आयोजन केलेले आहे.”
– पै. सागर गावडे, (स्वयंसेवक, मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन)
“आजपर्यंत झालेल्या बैलगाडा शर्यतींपैकी सगळ्यात छान नियोजन या स्पर्धेत केलेलं आहे. गाडामालकांनीही आयोजकांना सहकार्य करावं.”
– केतन नंदाराम जोरे, (गाडामालक)