शिरुर मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी माजी खासदार आढळराव पाटील यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । शिरुर लोकसभा मतदार संघातील महत्वाचे महामार्ग प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
या भेटीत पुणे-नाशिक महामार्गावरील खेड टोलनाका ते नाशिक फाटा, पुणे-शिरुर-नगर महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या प्रमुख महामार्गांचे विस्तारीकरण करण्याची नितांत आवश्यकता आढळराव पाटील यांनी बोलून दाखविली.
या भागातील प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर होऊन सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी येथील प्रलंबित कामे प्राधान्याने हाती घेतली जातील, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
वाहतूक कोंडीचा वस्तूनिष्ठ अहवाल
वाहतूक कोंडीचा वस्तूनिष्ठ अहवाल मांडून प्राधान्याने व गांभिर्याने ही कामे सुरु करण्यात यावी यासाठी आग्रही मागणी केली. या मागणील नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या कामांचे डीपीआर तातडीने पूर्ण करण्यात येऊन ही कामे लवकरात लवकर सुरू करण्याबाबत निर्देश गडकरींनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिफारस घेऊन हवेली व खेड तालुक्यातून जाणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकस्थळाला जोडणारा देहू-आळंदी-मरकळ-तुळापूर हा रु.५४.२२ कोटी रकमेचा प्रस्ताव केंद्रीय मार्ग निधीतून मंजूरीसाठी सादर झाला आहे. या कामाच्या मंजुरीची मागणीही यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी केली.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख महामार्गाचे प्रलंबित प्रकल्प हाती घेण्याबरोबरच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची शक्तीस्थळे असलेल्या वढू व तुळापूर मार्गावरील देहु – आळंदी – मरकळ – तूळापूर रस्ता मजबूतीकरणाच्या ५४ कोटी २२ लक्ष रकमेच्या प्रस्तावास केंद्रीय मार्ग निधीतून प्राधान्याने मंजूरी दिली जाईल, असे आश्वासन केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
“शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या चिकाटीची व पाठपुराव्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर होऊन सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी येथील प्रलंबित कामे प्राधान्याने हाती घेतली जातील” – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES