सातबारा उतारा चूक दुरूस्ती आता ऑनलाईन करता येणार
पुणे । सह्याद्री लाइव्ह । पुर्वी हाताने लिहिताना किंवा आताच्या काळात टायपिंगमध्ये झालेल्या चुकांमुळे सातबारा उता-यावर नाव, क्षेत्रांमध्ये अनेकदा चूका झाल्या आहेत. या चूका दुरूस्त करण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत होते. हे हेलपाटे मारावे लागू नये आणि ही प्रक्रिया सहजसोपी व्हावी यासाठी सरकारने चूक दुरूस्तीची प्रक्रिया आता ऑनलाईन केली आहे. जमाबंदी आयुक्तालयाने राज्याच्या महसूल विभागाकडे संगणकीकृत अथवा हस्तलिखित सातबारा उतारे दुरूस्तीचा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.
कंप्युटरवर टायपिंग करताना किंवा हाताने लिहिताना चुका होण्याची शक्यता अधिक असते. त्या चूका किंवा दुरूस्ती राहून गेलेले सातबारे उतारे दुरूस्ती करण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. त्यासाठी जमीनमालकांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे चुका दुरूस्त करणे सहज शक्य होणार आहे. १ ऑगष्टपासून राज्यभर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
प्रलंबित अर्जांचे रेकॉर्ड ठेवणे शक्य
यापुर्वी दुरूस्तीसाठी आलेले अर्ज तहसिलदारांच्या पातळीवर प्रलंबित राहिलेले आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामूळे त्यांना गती मिळाल्याचे दिसत नाही. लिखित स्वरूपात दिलेल्या अर्ज प्रक्रियेमुळे किती अर्ज नक्की प्रलंबित आहेत याचा ताळेबंद ठेवता येत नव्हता. परंतू आता ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे किती अर्ज प्रलंबित राहिलेले आहेत याचे रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे.
असा करा अर्ज
ई हक्क पोर्टलवर जाऊन नागरिकांनी सातबारा फेरफार यावर क्लिक करून तेथे अर्ज करावा. त्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर संबधित कागदपत्रांचे पुरावे तपासून तलाठी ती तहसिलदारांकडे मान्यतेसाठी पाठविली जाईल.
अर्जांची आकडेवारी
राज्यात आतापर्यंत सुमारे पाच लाख अर्ज दुरूस्तीसाठी प्रलंबित आहेत. त्यापैकी १ लाख ५ हजार ११९ अर्ज ऑनलाईन पद्धतीने आले आहेत. त्यातील ५९ हजार २३० अर्ज स्वीकारण्यात आले असून ६ हजार २२९ अर्ज तलाठ्यांकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सातबारा दुरूस्तीच्या अर्जांचा आढावा घेण्याची सूचना सर्व जिल्हाधिका-यांना करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्जांचीही आता ऑनलाईन एंट्री करण्यात येणार आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES