महावितरण अपडेट । घरबसल्या आपले वीजबील भरा आणि पैसे आणि वेळेची बचत करा!
खिशातील मोबाईलचा वापर करून चहावाला, भाजीवाला व रिक्षावाला यांना झटकन पेमेंट करणारा महावितरणचा विजग्राहक मात्र आपले विजेचे बिल भरण्यासाठी रांगेत कसा उभा राहतो, हे आजच्या डिजिटल युगातील कोडेच नव्हे तर काय? रांगेत उभे राहून आपला वेळ व पैसा वाया घालवणे हे खरोखरच आश्चर्यकारक नाही का? आजच्या डिजिटल युगात महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील 39 टक्के लघुदाब वीज ग्राहक आपला वेळ व पैसा वाया घालवत रांगेत उभे राहून वीज बिल भरत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
घरबसल्या वीज बिलाचा भरणा करणे आता शक्य असून यामुळे वेळ व पैशाची बचत होते. तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर केला तर यावर महावितरण दरमहा 3.78 टक्के सवलत देत असल्याची माहिती महावितरण पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली आहे.
वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवरून असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते. याखेरीज ग्राहकांनी छापील अथवा डिजिटल बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही बिल भरता येते. कागदी बिलाऐवजी ईमेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरण पूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.
चेकने वीज बिलाचा भरणा करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. चेक बाऊन्स झाला तर दंड व कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. असे असूनही पुणे प्रादेशिक विभागात या महिन्यात वीज बिलाचे 12 हजार 836 चेक बाऊन्स झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार महावितरण पुणे प्रादेशिक विभागात जून महिन्यात एकूण 47 लाख 86 हजार 692 ग्राहकांनी 1392 कोटी रुपयांच्या विजबिलाचा भरणा केला. त्यापैकी 29 लाख 40 हजार ग्राहकांनी 913 कोटी रुपयाचे ऑनलाइन भरणा केलेला आहे. म्हणजेच जवळपास 39 टक्के ग्राहकांनी खिशात मोबाईल असतांना उगीच रांगेत उभे राहून आपला वेळ व पैसे वाया घालवला.
या जून महिन्यात पुणे परिमंडळात 26 टक्के ग्राहकांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर न करता व रांगेत उभे राहून वीज बिल भरले तर कोल्हापूर परिमंडळात यांचे प्रमाण जवळपास 56 टक्के तर बारामतीत यांचे प्रमाण हे 48 टक्क्यांवर आहे. त्यामुळे त्यांना महावितरण कडून मिळणाऱ्या सवलतीला मुकावे लागले.
ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठीचे पर्याय
मोबाईल ॲप
प्ले स्टोअर व ॲप स्टोअरवर महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे. ते मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यात वीजबिल पाहण्याची, भरण्याची, वीजपुरवठा व वीजबिलासंबंधी तक्रारी नोंदविण्याची सोय आहे. नावात बदल, वीजभार कमी – जास्तीची मागणी सुद्धा नोंदवता येते. महावितरणचे मोबाईल ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.msedcl.app ही लिंक वापरावी.
युपीआय गेटवेज
BHIM, Gpay, PhonePay, Paytm बँक खात्याशी संलग्न करून वीजबिल सुलभरीत्या भरता येते. एकदा यावर वीजबिल भरले तर पुढचे वीजबिल तयार होताच त्या ॲपद्वारे पुढील बिल भरण्याची सूचना मिळते.
क्यूआर कोड
वीजबिलावर क्यूआर कोड छापला जातो. क्यूआर कोडला यूपीआय ॲपद्वारे स्कॅन केल्यावर वीजबिल भरता येते.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES