इच्छुकांच्या ‘भाऊ’गर्दीत महायुतीचा कस लागणार?
मु. पो. राजकारण…
सह्याद्री लाइव्ह
केंद्रातील सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्ष राज्या-राज्यात ‘ऑपरेशन लोटस’चा प्रभावीपणे वापर करतंय… एवढंच काय तर केंद्रीय एजन्सींच्या (इडी, सीबीआय, आयटी) माध्यमातून भाजप विरोधी पक्षाला बेजार करुन ‘ऑपरेशन लोटस’ राबवित आहे… अशी उघडपणे चर्चा रंगू लागली आहे. आता इंजेक्शन देवून ‘कमळ’ फुलविणारी भाजपची ‘विचारधारा’ विरोधकांसह स्वपक्षालाच पचनी पडेल, याचा नेम नाही…
महाराष्ट्रामध्ये ‘ऑपरेशन लोटस’चं मिशन किती यशस्वी झाले… हा विषय निराळा असला तरी नव्यानं पक्षाला मजबूत करण्यासाठी भाजपनं महाराष्ट्रभर नवी रणनीती आखली आहे. एवढंच कशाला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याचा विचार केला तर चार अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठी दोन अध्यक्ष तर आता पुणे जिल्ह्यासाठी भाजपनं दोन जिल्हाध्यक्षांची निवड केली आहे. पुणे जिल्हा (ग्रामीण) बारामतीसाठी वासुदेव काळे आणि शिरुर-मावळसाठी शरद बुट्टे पाटील यांची नियुक्ती केली आहे. खरंतर जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्षांची निवड करून जिल्ह्यात भाजपचे पाय रोवण्याचा मानस दिसतोय.
गेल्या काही काळापासून खेड-आळंदी विधानसभा आणि शिरूर लोकसभेवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या पुणे ग्रामीण (उत्तर) जिल्हाध्यक्षपदी खेड तालुक्याच्या शरद बुट्टे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, हवेली आणि शिरूर अशा सहा तालुक्यांची जबाबदारी बुट्टे पाटील यांच्यावर असणार आहे.
अभ्यासू कार्यकर्त्याला संधी…
आता शरद बुट्टे पाटील यांचा प्रशासन, कृषी व पशुसंवर्धन, ग्रामविकास अशा अनेक क्षेत्रांचा गाढा अभ्यास आहे. सलग तीन टर्म जिल्हा परिषदेवर ते निवडून गेले आहेत. २००७ साली आदर्श जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. २०१४ मध्ये खेड- आळंदी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक ते लढले होते. अभ्यासू व्यक्तिमत्वाकडे नेतृत्व सोपवून नवे चेहरे समोर आणण्याची भाजपची रणनीती शरद बुट्टे पाटील यांच्या नियुक्तीनंतर अधोरेखित झाली आहे.
जिल्हाध्यक्ष म्हणून विधानसभा आणि लोकसभेवर भाजपचा उमेदवार निवडून यावा, अशी मनीषा बुट्टे पाटील यांनी ‘सह्याद्री लाइव्ह’ला दिलेल्या ‘विशेष मुलाखती’मध्ये बोलून दाखवली. जरी आता युती झाली असली तरी त्याआधीपासूनच विधानसभा आणि लोकसभेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी-शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचं अस्तित्व सिद्ध करण्याची कसोटी
सध्या राज्यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट)-भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीमुळे कदाचित आतापर्यंत विरोधात काम केलेल्या नेते, कार्यकर्त्यांसाठी बुट्टे पाटील यांना काम करावे लागणार आहे; परंतु सगळ्यांना सोबत घेऊन जाताना सगळ्यांशी जुळवून घ्यावेच लागते, असे मत व्यक्त करत त्यांनी आगामी राजकारणातील रणनीतीचे स्पष्ट संकेत दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारलेला नेता कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याला सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी ‘सह्याद्री लाइव्ह’ला दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने दिले. परंतु खेड तालुक्यातील आजवरचे राजकारण आणि सध्याची राजकीय स्थिती पाहता महायुतीतल्या मित्र पक्षांशी जुळवून घेत ही जबाबदारी पेलावताना शरद बुट्टे पाटील यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
पहा शरद बुट्टे पाटील यांची संपुर्ण मुलाखत – https://youtu.be/Dg7bOxr6vcE
सध्या स्थानिक राजकारण पाहता खेड-आळंदी विधानसभा आणि शिरूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील कोणत्या पक्षाला संधी मिळणार, हा प्रश्न मोठा आहे. महायुतीनंतर शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे यांना संधी मिळणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. एवढंच काय तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे तर शिरुर लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. बरं आता शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) डॉ. अमोल कोल्हे हे खासदार आहेत. म्हणजेच लोकसभेचा विचार केला तर तिकीट वाटपासाठी महायुतीला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हा झाला लोकसभेचा मुद्दा.
विधानसभानिहाय विचार केला तर मावळमध्ये सुनील शेळके, खेड-आळंदीमध्ये दिलीप मोहिते, आंबेगाव-शिरुरमध्ये दिलीप वळसे, शिरुर-हवेलीमध्ये ॲड. अशोक पवार, जुन्नरमध्ये अतुल बेनके हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपला उत्तर पुणे जिल्ह्यात बस्तान बसवायचं असेल तर अतोनात कष्ट करावे लागणार आहेत.
आता मुख्यत्वे खेड-आळंदी विधानसभेचा विचार केला तर… महायुतीमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते हे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात २०२४ मध्ये चौथ्यांदा नशिब आजमावतील, अशी सद्यस्थिती आहे. आमदारकीसाठी शिवसेनेकडे (ठाकरे गट) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे यांच्या रुपाने चर्चेतला उमेदवार म्हणून पाहता येईल. २०१९ मध्ये भाजपकडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनीही नशिब आजमावले आहे, त्यावेळी त्यांनी ५० हजारांहून अधिक मते घेतली होती. या राजकारणात शिवसेनेचे उमेदवार स्वर्गीय सुरेश गोरे आणि अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्यातील मतविभाजनाचा फायदा आमदार मोहिते यांना झाला होता. म्हणजेच दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ झाला. अर्थातच आमदार दिलीप मोहिते हे २०१९ चे लाभार्थी ठरले…
स्थानिक राजकारणाचा विचार केला तर २०२४ मध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सामना रंगणार , अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात बरंच पाणी पुलाखालून जाईल आणि राजकारणाच्या अनेक पातळ्या आपल्याला पाहायला मिळतील, हे ही तितकेचं खरे आहे. मात्र उत्तर पुणे जिल्ह्याला मिळालेल्या भाजपच्या नव्या अध्यक्षांचा पक्षाला फायदा होतो, की केवळ महायुतीचा उमेदवार, कार्यकर्त्यांचा प्रचारातच भाजपची यंत्रणा राबणार हे आगामी काळात अधोरेखित होईल, हे मात्र निश्चित…
लेखक
अमित सोपान शिंदे.
खेड टाइम्स । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर, खेड
आमदार दिलीप मोहिते पुन्हा रिंगणात?
आमदार दिलीप मोहितेंना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसाठी खेड-आळंदीची जागा सोडणार याचं उत्तर येणारा काळंच देऊ शकतो. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी आजवर विरोधक म्हणून एकमेकांविरोधात बाह्या सावरणारे हे नेतेमंडळी युतीखातर एकमेकांना खरंच मदत करणार का? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES