प्रधानमंत्री पीक विमा योतनेंतर्गत शेतक-यांना एक रुपयात पीक विमा
कुळाने शेती करणारे शेतकरीही घेऊ शकतात योजनेचा लाभ
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेकदा शेतक-याला हातचे पीक गमवावे लागते. शासनाकडून अशा नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत दिली जाते, अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ होय.
काय आहे ही योजना?
कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ ही ऐच्छिक योजना आहे. खातेदारांसोबत कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शेतक-यांना केवळ एक रुपया भरून विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. या पीक विमा योजनेंतर्गत विम्याच्या हप्त्याची रक्कम राज्य शासनाकडून भरण्यात येणार आहे. शेतक-यावर कर्जाचा कुठलाही भार राहू नये यासाठी शासनाकडून केला गेलेला हा एक प्रयत्न आहे.
कोणत्या पीकांसाठी आहे ही योजना?
खरीप हंगामामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मुग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबिन, कापूस व खरीप कांदा या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ तसेच क्षेत्रातील शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम २०२३ साठी ३१ जुलै असणार आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी काय करावे?
या योजनेत सहभागी होऊ इच्छिणा-या पात्र शेतकरी जवळची बँक शाखा, सहकारी सोसायटी, जनसुविधा केंद्र, विमा कंपनीचे कार्यलय, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे जमीन मालकी दस्तऐवज 7/12, 8-अ, आधारकार्ड, बँक पासबुक, राज्य अधिसूचनेत अनिवार्य असल्यास पीक पेरणी प्रमाणपत्र कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
72 तासाच्या आत नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक
भूस्खलन, गारपीट, ढगफुटी, विज पडणे आणि पूर येणे अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पीकांना झालेली नुकसान भरपाई या विम्यातून दिली जाईल. परंतू जोखिमेचा संरक्षण लाभ मिळण्यासाठी घटना घडताच 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. काढणीपश्चात नुकसान भरपाई बाबींमध्ये शेतात पिकांची कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेली अधिसूचित पिके कापणीपासून जास्तीत-जास्त दोन आठवड्यापर्यंत गारपीट, वादळ, चक्रीवादळ व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. या नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.
काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत संरक्षण
या योजनेंतर्गत जोखमतीच्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहे. त्यात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे सरासरी उत्पादनाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम अनुज्ञेय होते. या जोखिमेस पीक काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत विमा संरक्षण देय असते.