पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर केल्याबद्दल हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, तसेच केंद्रीय सचिव पंकज कुमार उपस्थित होते.
नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात उपराष्ट्रपती यांच्या हस्ते राज्य, शहरं, नगरपालिका, तसेच ग्रामपंचायतींना विविध श्रेणीतील कामगीरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला तिसरा उत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला. मेघालय राज्यातील मावकिर्देप या ग्राम पंचायती सोबत विभागून हा पुरस्कार मिळालेला आहे.