भारतातील विविध भूमापन पद्धती
भारतातील जमिनींची मोजणी १० एप्रिल १८०२ रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त भारतातील विविध भूमापन पद्धतींवर नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे यांनी टाकलेला प्रकाशझोत…
। सह्याद्री लाइव्ह । आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील की, गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले? पूर्वी मोजणी व शेतसारा कर पद्धत कशी होती? त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला १ गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.
जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले. तसेच जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली. त्यात त्याला अतोनात परिश्रम झाले व त्यातच त्याचे निधन झाले. त्याचीच आठवण म्हणून जगातील सर्वोच्च उंच शिखराला त्याचे नाव देण्यात आले.
राज्यकारभार चालविण्यासाठी जमिनीच्या एकूण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणुन घेण्याची पद्धत पुरातन काळापासून आहे. भारतामध्ये इ. स. पूर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसूलाची निश्चित पद्धत होती. भारतात जमिनीचे सर्वेक्षण व नकाशे तयार करण्याची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रह्मांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधु संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याकाळाची नियोजनबद्ध संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषात दिसून येते. शंखापासून बनविलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने त्याकाळी केला आहे.
मौर्य साम्राज्यामध्ये जमिनीची मोजणी व नोंदणी ठेवण्यासाठी “रज्जूक” नावाचा अधिकारी नेमला जाई. जमीन मोजणीसाठी दोरीचा प्रथम वापर केला गेला. मौर्यांच्या काळात संस्कृतमधील “रज्जू” यावरून “रज्जूक” हा शब्द प्रचलित झाला. कौटिल्याच्या म्हणजेच आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनीची मोजणी, प्रतवारी, सर्वेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी करून जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व त्यावरील पिकांच्या आधारे तिच्यावरील कराची निश्चिती केली जात असे.
जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसूल पद्धत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ. स. १५४० ते १५४५ दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीनधारकाची तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करण्यात आली. हा महसूल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीनधारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याच्या मदतीने कर पद्धतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळीचा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करण्यात आली.
जमिनीच्या एकूण उत्पन्नापैकी १/३ हिस्सा कर म्हणून घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मूल्यांकन करून मागील १९ वर्षांच्या सरासरी इतके पुढील १० वर्षांसाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे. मंत्री तोरडमलची पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलिक अंबर यानेही सन १६०५ ते १६२६ या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पद्धती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पद्धत अंमलात आणली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सन १६७४ पासून जमीन महसूल आकारणीसाठी “खेडे” हे एकक वापरले जात असे. पीक उत्पादन करणाऱ्यांची क्षमता पाहून कर आकारणी (शेतसारा) बसविला जाई. या पद्धतीला “कमालधारा” म्हटले जाई. प्रत्येक गावात मामलेदार हे देशमुख, देशपांडे, वतनदार व पाटील यांच्या मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करत असत. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात ही पद्धत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला.
मराठेशाहीमध्ये इनाम, वतन व मिरास हे शब्द जमिनीच्या महसूल आकारणीशी निगडीत होते. याद्वारे जमिनीची मालकी व महसूल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. हे अधिकार वंश परंपरागत होते. अशा प्रकारे भारताच्या विविध प्रांतांमध्ये मोजणी व शेतसारा कर वेगवेगळ्या पद्धतीने अंमलात होते.
१८ व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भीमा नदीपासून तापी नदीकाठच्या बहरानपूर विस्तृत भूप्रदेश प्रथमत: नकाशात बसविला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा, अजंठा टेकड्या, महत्त्वाची गावे व नद्या सांकेतिक पद्धतीने दाखविल्या आहेत. याच दरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेला आहे.
ब्रिटिशांनी सन १७५७ पर्यंत भारतीय भूभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटिश हे व्यापारी म्हणून भारतात आले होते. त्यांना व्यापारी दृष्टीकोनातुन भारतामधून उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमीन हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन होते. म्हणून ब्रिटिशांनी उत्पन्न मिळविण्याकरिता जमिनीची शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातून ब्रिटिशांनी सन १७६७ मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली व या पदावर सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून जेम्स रनेल यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स रनेल लिखीत ”Bengals Atlas” या पुस्तकात शंकु साखळीने जमिनीची मापे आणि खगोल शास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशे तयार केले असा उल्लेख आहे.
सर लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून १० एप्रिल १८०२ मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास (चेन्नई) जवळील थॉमस पर्वतापासून केली. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमितीय भूमापनाचे अधीक्षक होते. १८३० मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. जॉर्ज एव्हरेस्ट यांना ‘सर्व्हेअर जनरल बहादूर’ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्टन यांचा मृत्यू झाला. बरेच भूकरमापक मोजणी वेळी शरणागती झाले. त्यांची इतिहासात नोंद नाही. जनता याबाबत अनभिज्ञ आहे. पुढे हे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी ३३ वर्षात पूर्ण केले. अशा प्रकारे भारतीय भूखंडाचे मोजणी काम एकूण ३७ वर्षात पूर्ण झाले.
सन १८१८ मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी मराठ्यांकडून सत्ता काबीज केली, त्यावेळी दक्षिण विभागाचे राजकारणी कमिशन माउन्ट स्टूअर्ट एल्फिन्स्टन यांनी रयतवारी पद्धतीचा पाया घातला. ब्रिटिशांच्या कारकिर्दीत दुसरी महत्त्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुद्ध पद्धतीने गुंटर नांवाच्या अधिकाऱ्याने अंमलात आणलेल्या शंकू साखळीने मोजणी करण्यात आली. म्हणून शंकू साखळीस गुंटर चैन, गुंठा असे म्हणत. सदर साखळी ३३ फुट लांबीची असून १६ भागांत विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हणत व गुंटर साहेबांच्या नावावरुन पुढे गुंठा प्रचलित झाला. ४० गुंठ्याच्या जमिनीच्या क्षेत्राला एक एकर म्हणत असे.
जमीन महसूल ठरविण्याचा पहिला मान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सन १८२७ मध्ये मिळविला. सध्या अस्तित्त्वात असलेली जमीन महसूल आकारण्याची पद्धत ब्रिटिश राजवटीत ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार आहे. भूमापन पुस्तिका व नगर भूमापन पुस्तिका यामध्ये सविस्तर मोजणी पद्धती दिल्या आहेत.
इंग्रजांच्या काळात शंकू साखळी पद्धतीने मोजणी केली जायची. नंतर प्लेन टेबल मोजणी होत असे. नंतर E. T. S ने मोजणी केली जायची, आता रोव्हर या अत्याधुनिक तंत्राद्वारे अक्षांश व रेखांशने मोजणीचे काम केले जाते.
रोव्हरद्वारे मोजणीची वैशिष्टे/फायदे
रोव्हरद्वारे मोजणी अर्धा तासात होते. मनुष्यबळ कमी लागते, कमी श्रमात मोजणी काम होते. पूर्वी एका हेक्टरसाठी एक दिवस लागत असे. आता अर्ध्या तासात मोजणी होते. या मोजणीची अचूकता १५ सेंटिमीटरची आहे. अक्षांश, रेखांश कायम स्वरुपी राहणार आहेत. नकाशावरील असल्यास जी. पी. एस. द्वारे मोबाईद्वारे जमिनीच्या मिळकतीची सीमा पाहू शकता. अशा अत्याधुनिक रोव्हर यंत्रणेचा वापर होत असल्याने तत्परतेने मोजणी होते.
– श्री. किरण कांगणे, नगर भूमापन अधिकारी