एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयात भगवान श्री शिवशंकराच्या पिंडीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा
पुणे । सह्याद्री लाइव्ह । माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय, तळेगाव दाभाडे यांच्यावतीने माता पार्वती, बुध्दी स्वरूप गणेश, भक्ती शक्तीस्वरूप श्री हनुमान यांच्यासह दिव्य ज्ञान व नादब्रह्मस्वरूप ओंकाराची प्रतिकृती असलेल्या भगवान श्री शिवशंकराच्या पिंडीचा प्राणप्रतिष्ठान सोहळा सोमवार २७ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या सहकार्यकारी विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड नागरे यांनी दिली.
ही प्राणप्रतिष्ठपना आळंदी येथील स्वामी स्वरूपानंद सरस्वती, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देव गिरी महाराज, तत्वज्ञ डॉ. राम विलास वेदांती, किर्तनकार ह. भ. प.किसन महाराज साखरे, बनारस येथील विचारवंत डॉ. योगेंद्र मिश्रा, बद्रिनाथधाम येथील माजी धर्माधिकारी उन्नीयाल धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे सन्माननीय अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्वान व संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ हे शुभशिर्वाद देण्यास उपस्थित राहतील.
शुक्रवार २४ मार्च ते सोमवार २७ मार्च २०२३ या काळात तळेगाव दाभाडे येथील एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या मंदिर परिसरात विभिन्न धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वा. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. तसेच ह. भ. प. गणपत महाराज जगताप यांचे सुश्राव्य कीर्तन आणि हरिपाठ होणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप
- २५ मार्च – सकाळी १० वा. पुण्याहवाचन, देवता स्थापना, होम हवन. संध्या ६ वा. हरिपाठ. संध्या. ७ ते ९ वाजेपर्यंत ह. भ. प. बापूसाहेब मोरे यांचे सुश्राव्य कीर्तन.
- २६ मार्च – सकाळी १० वा. स्थापित देवता पूजन व शिखर स्थान. संध्याकाळी ६ ते ७ वा. हरिपाठ आणि संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ह. भ. प. सुदाम महाराज पाणेगांवकर यांचे कीर्तन.
- २७ मार्च – रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत मुख्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा. त्यानंतर ह. भ. प. उत्तरेश्वर माऊली पिंपरीकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद.