‘पांगरी’ एक ऐतिहासिक गाव
। सह्याद्री लाइव्ह ।
इतिहासाच्या उदरात सापडणा-या पूर्वजांच्या पाऊलखूणा आपल्या अस्तित्वाच्या अनुभूतीला एक अनोखा भावनिक स्पर्श देऊन जातात. आपल्या भूतकाळाशी, आपल्या पूर्वजांशी आपली नाळ कधीच तुटू शकत नाही. आपण कुठून आलो? कुठे जाणार? असे अनेक प्रश्न तर्कबुद्धी विकसित झालेल्या मानवजातीला नेहमी पडत असतात. याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधी मृगजळासारख्या अस्तित्वहिन भविष्याकडे तर कधी हजारो वर्षांच्या भौतिक, भावनीक आणि वैचारिक प्रवासाकडे अर्थात इतिहासाकडे घेऊन जातात. अगदी अडगळीच्या खोलीत धुळ खात पडलेली पेटी असो किंवा तीन हजार वर्षापूर्वीचा इतिहास सांगणारे हडप्पा आणि मोहेंजोदडो, यासगळ्यातून खरं तर आपला भूतकाळ आपल्याला खूणावत असतो. गतकाळात हयात असलेल्या सजीव, निर्जीव अशा सगळ्याच गोष्टींचा शोध घेण्याची नैसर्गिक ओढ माणसाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी महत्वाची ठरते.
इतिहास हा सर्वसमावेशक असा विषय आहे. कोणत्याही विषयाचा अभ्यास हा इतिहासाशिवाय अर्थशुन्य असतो. अगदी अश्मयुगीन काळापासून मानवी अस्तिवाचे पूरावे आजवर इतिहासकारांनी प्रकाशात आणले आहेत. हडप्पा आणि मोहेंजोदडोसारखी जगप्रसिद्ध असलेली ठिकाणे सगळ्यांनाच ठाऊक असतील. हजारो वर्ष कितीतरी फूट मातीखाली राहीलेले हे सिंधू संस्कृतीचे अवशेष गतकाळातील जीवनशैलीची कल्पना आपल्या डोळ्यापूढे उभी करतात. गतकाळातील लोक, त्यांचं राहाणीमान, त्यांच्या प्रथा परंपरा अशी कितीतरी कवाडं हे पुरातन भग्नावस्थेत असलेले अवशेष आपल्यासाठी उघडतात. पुरातन अवशेष त्या जागेचा फक्त मानवीच नव्हे तर भौगालिक इतिहासही सांगून जातात. आपल्या आसपासच्या जगातही आपल्या दैनंदिन जीवनाच्या धावपळीत दुर्लक्ष झालेल्या अनेक अशा गोष्टी आपल्या गतकाळाची साक्ष देत उभ्या असतात. घरापुढे, गावच्या वेशीवर, नदीकाठी अपण सहज दुर्लक्ष केलेली वड, पिंपळाची झाडे आपल्या आधीच्या काही पिढ्यांच्या आठवणी सांगत असतात. गावातली पूरातन मंदीरे, नदीकाठी, गावाबाहेरच्या डोंगरावर भग्नावस्थेत पडलेल्या मूर्ती यांचा इतिहास कदाचित काही शतकांपूर्वीचाही असू शकतो. दुर्दैवाने दुर्लक्षीत राहून अशा इतिहासाच्या कितीतरी पाउलखूणा इतिहासजमा होत आहेत.
खेड तालुक्यातलं राजगुरुनगरपासून काही अंतरावर असलेलं पांगरी हे गाव… आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासाचे पूरावे नकळतपणे जपत आलेलं हे गाव. इसवी सन ९६५ मधील एका ताम्रपटात उल्लेख आलेल्या या गावचा अगदी ताम्रपाषाण युगापासूनचा सलग इतिहास आजही जिवंत आहे. तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास सांगणारे हे पूरावे आजही आपण पाहू शकतो. या गावाला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा गावातल्या अशाच काही पुरातन अवशेषांमूळे जगासमोर आला.
पांगरीका हेच पांगरी!
इसवी सनाच्या दहाव्या शतकातील सिंद राजा आदित्यवर्मन याचा एक ताम्रपट खानदेशात सापडला. या ताम्रपटामध्ये पुणे जिल्ह्यातील काही गावांचा उल्लेख असल्याचं पुरातत्वशात्रज्ञांच्या संशोधनातून समोर आलं. याच ताम्रपटात दान दिलेल्या एका गावाच्या चतुर्सीमा सांगताना ‘पांगरीका’ या गावाचा उल्लेख आला. हे गाव नक्की कोणतं असावं? याबद्दल अनेक विद्वानांनी संशोधन केलं. पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. हरिहर ठोसर यांनी हे गाव खेड जवळचे पांगरी हे असावे असा अंदाज वर्तवला. राजा आदित्यवर्मन याच्या या ताम्रपटातील उल्लेखलेल्या गावांमध्ये यासंदर्भात काही पुरावे मिळतात का? याचा शोध संशोधक घेऊ लागले.
“तीन हजार वर्षांपासूनचा सलग इतिहास पुरातन अवशेषांमधून सापडतो त्यामूळे पांगरी या गावाला ऐतिहासिक महत्व आहे”.
“खरं तर दहाव्या शतकातील सिंद राजा आदित्यवर्मन याच्या एका ताम्रपटातील गावांच्या शोधात आम्ही पांगरी गावात पोहोचलो. पण गावातील नदीच्या काठाला लागून असलेला ‘पांढरीचा कडा’ येथे सापडलेल्या सातवाहनकालीन खापरं आणि अवशेषांवरून या गावचा इतिहास काही शतके नव्हे तर काही सहस्त्रके मागे घेऊन जाणारा आहे हे आमच्या लक्षात आलं. महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हणजे ताम्रपाषाणयुगातील मानवी वसाहतीचे काही पूरावे आम्हाला त्याठिकाणी आढळून आले. तीन हजार वर्षांपासूनचा सलग इतिहास पुरातन अवशेषांमधून सापडतो त्यामूळे पांगरी या गावाला ऐतिहासिक महत्व आहे”.
– डॉ. वरदा खळदकर (संशोधिका कलकत्ता विद्यापीठ.)
…
पांढरीच्या टेकाडबद्दल, त्याच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल स्थानिक लोकांना काहीही माहीती नसल्यामूळे हे ऐतिहासिक ठिकाण अनेक वर्ष अंधारतच राहीले. कदाचित या अज्ञानामूळे आणि नागरी हस्तक्षेपापासून दूर राहिल्यामूळे हे अवशेष आजपर्यंत जिवंत राहीले.
“आज लोक तिला होलिका नावाने पूजतात, पण मूळात ही गजलक्ष्मी माता म्हणजे सुफलन आणि संमृद्धीची देवता आहे”.
“या गावात केलेल्या सर्वेक्षणातून आम्हाला गजलक्ष्मी देवीचे इसवी सन १० ते १२ च्या दरम्यानचे एक शिल्प आढळून आले. या देवीला होलिका माता म्हणून स्थानिक ग्रामस्थ पुजतात. आज लोक तिला होलिका नावाने पूजतात पण मूळात ही गजलक्ष्मी माता म्हणजे सुफलन आणि संमृद्धीची देवता आहे”.
– डॉ. मंजिरी भालेराव (सहाय्यक प्राध्यापिका, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.)
…
“हे शिल्प गावक-यांच्या दृष्टिने जरी होलिका माता असलं तरी या इतिहासाच्या भाषेत गजलक्ष्मी किंवा गजांतलक्ष्मी असं म्हणतात, हि यादवांची कुलदेवता आहे”.
“या पांगरी गावाला फार जूना ऐतिहासिक वारसा आहे. हे शिल्प गावक-यांच्या दृष्टिने जरी होलिका माता असलं तरी या इतिहासाच्या भाषेत गजलक्ष्मी किंवा गजांतलक्ष्मी असं म्हणतात, हि यादवांची कुलदेवता आहे. धनाची देवी म्हणून या देवीची पूजा यादव करत होते”.
– राजेंद्र सुतार (परिसर अभ्यासक)
…
गावातल्या ग्रामदेवत रोकडोबा देवाच्या मंदीराजवळ त्यांना इसवी सन १० ते १२ च्या दरम्यानचे एक शिल्प आढळून आले. हे शिल्प यादवांची कुलदेवता गजलक्ष्मी देवीचे असल्याचे संशोधनातून समजले. या देवीला होलिका माता म्हणून या गावचे लोक गेले काही वर्ष पूजीत आहेत. परंतू खंर तर ही यादवकालीन गजलक्ष्मी माता सुफलन आणि संमृद्धीची देवता म्हणून पूजली जात होती.
या शिल्पामध्ये मध्यभागी लक्ष्मी माता आणि दोन्ही बाजूने तिच्यावर पाण्याचा वर्षाव करणारे हत्ती दिसतात. हे हत्ती म्हणजे मेघ आणि लक्ष्मी माता म्हणजे पृथ्वी असे या शिल्पाचे विश्लेषण संशोधकांनी केले आहे. हि गजलक्ष्मी माता पाउस आणि जीवनात सुख-संमृद्धी नांदावी यासाठी हिंदू, बौद्ध, जैन अशा अनेक धर्मीयांकडून पूजली जात होती.
“पुर्वीच्याकाळी मरु नावाचा एक दैत्य होता. या दैत्याने जगामध्ये अनाचार माजवून अगदी देवांनाही हैरान करून सोडले होते. या दैत्याचा वध करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महादेव यांनी आपल्या श्वासोच्छवासातून होलिका नावाच्या देवीची निर्मिती केली. या देवीने मरू राक्षसाचा अंत करून या सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केले”.
– विठ्ठल गुरव (पुजारी, पांगरीगाव.)
…
पांगरी गावचे लोक या गजलक्ष्मी मातेला होलिका माता म्हणून गेली अनेक वर्ष पूजत आले आहेत. दरवर्षी सालाबादप्रमाणे येणा-या होळीच्या सणाला गावकरी देवीला नैवेद्य दाखवत असतात. गावक-यांच्या मान्यतेनुसार आपल्या मूलांच्या संरक्षणासाठी होलिका मातेची पूजा करतात तिला नैवेद्य दाखवला जातो असं या ठिकाणच्या महिला ग्रामस्थ मानतात.
“होळीच्या दिवशी होलिका मातेला पुरणपोळी, आमटीभात, कुरडई, तांदळाच्या पापड्या, उडीदाचा पापड, दुध असा सगळा नैवेद्य करतात. होलिका माता हि लेकूरवाळी आहे त्यामुळे आपल्या मूलाचे कोणत्याही बाधांपासून संरक्षण व्हावं म्हणून साप, विंचू, जोडवी, बांगड्या अशा आकाराचे पदार्थही या नैवेद्यात ठेवतात”.
– सविता लक्ष्मण गुरव (महिला भाविक पांगरीगाव.)
…
प्राचीन भारतीय संस्कृतीपासून मुर्तीपूजेला महत्व असल्यामूळे अनेक ठिकाणी अशा या पुरातन शिल्पांचे संवर्धन झालेले पहायला मिळते. प्रत्येक वेगळ्या कालखंडामध्ये या मुर्तींना पूजन्याची कारणं, रूढी, प्रथा, परंपरा या बदललेल्या आपल्याला पहायला मिळतात. परंतू हा आपल्या पूर्वजांकडून मिळालेला वारसा म्हणून प्रत्येक त्या त्या कालखंडातील लोकांनी जपलेला दिसतो. काळानूसार समाजव्यवस्था बदलते, समाजाच्या विचाराधारा, मते बदलतात आणि हेच बदलेले विचार या पुरातन गोष्टींकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन समाजाला देत असतात. मुळ इतिहासापासून बदलत जाणा-या या धारणा नवनवीन प्रथा, परंपरांना जन्म देत असतात. याचं वास्तविक उदाहरण म्हणजे ही गजलक्ष्मी माता…
ताम्रपाषाण युगातील म्हणजेच सातवाहनकालीन अवशेष या गावच्या आद्य वसाहतींचा इतिहास सांगून जातात. इसवीसनाच्या दहाव्या शतकात ताम्रपटात आलेला उल्लेख हा भारतीय इतिहासाच्या प्राचीन कालखंडातले या गावचे अस्तित्व सांगतात. त्यांनंतर १० व्या शतकानंतरच्या बनावट शैलीतील गजलक्ष्मी मातेची मूर्ती भारतीय इतिहासाचा मध्ययुगीन कालखंड समोर आणते. या गावातले हे पुरातन अवशेष आणि शिल्प ताम्रपाषाण युगापासूनचा सलग इतिहास सांगतात त्यामूळे या गावाला ऐतिहासिक महत्व प्राप्त होते.
अमित सोपान शिंदे
। खेड टाइम्स । सह्याद्री लाइव्ह ।
राजगुरूनगर, खेड