खालुंब्रे – हुंद्दाई रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यु एक गंभीर जखमी
म्हाळुंगे । सह्याद्री लाइव्ह । म्हाळुंगे परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यु झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. खालुंब्रे – हुद्दाई रस्त्यावर सोमवारी (दि. २०) रात्री पावणेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
मयुर मारूती बोंबले (वय २८, रा. येलवाडी, ता. खेड) असे या अपघातात मृत्यु झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी घनश्याम बाळासाहेब गाडे (वय ३५, रा. येलवाडी, ता. खेड) यांनी म्हाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून बळीराम शिवाजी देवकाते (रा. देहूगाव, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घनश्याम गाडे यांचा मेव्हणा मयुर बोंबले सोमवारी (दि. २०) रात्री पावणेनऊच्या सुमारास खालुंब्रे – हुद्दाई रस्त्यावर आपल्या दुचाकीवरून जात असताना बळीराम देवकाते यांच्या समोरून भरधाव येणा-या दुचाकीची त्याच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे मयुर बोंबले याचा मृत्यु झाला तर बळीराम देवकाते गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक गायकवाड तपास करत आहेत.