“योगी आदित्यनाथ यांचं लोकसंख्या नियंत्रण धोरण महिलांसाठी त्रासदायक”, असदुद्दीन ओवैसींचा दावा!
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या लोकसंख्या नियंत्रण धोरणाविषयी राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. २ अपत्यांचा नियम चर्चेचा विषय ठरलेला असताना आता त्यावर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. “योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलेलं लोकसंख्या नियंत्रण धोरण हे महिलांसाठी त्रासदायक ठरेल”, असा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. तसेच, “हे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर करून योगींनी थेट मोदी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे”, असं देखील ओवैसी म्हणाले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकारांशी बोलताना नव्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावर आगपाखड केली आहे.
“मोदी सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं की…”
आपला दावा सिद्ध करण्यासाठी AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारने २०२०मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेतला आहे. “डिसेंबर २०२०मध्ये केंद्रातील मोदी सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं की जन्मदर (Total Fertility Rate) घटू लागल्यामुळे देशात दोन अपत्य धोरण राबवता येणार नाही. पण दुसरीकडे आता योगी सरकार मात्र त्यालाच विरोध करत आहे. हा प्रस्ताव मांडून योगी सरकार मोदी सरकारच्या विरोधात जाणार का?” असा सवाल ओवैसींनी केला आहे.