कलाकारांच्या कलागुणांना जी-२० परिषदेतील प्रतिनिधींचा प्रतिसाद – उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींना राज्यातील अभिजात कला व संस्कृतीची माहिती देणारे स्टॉल परिषदस्थळी उद्योग विभागामार्फत उभारण्यात आले आहेत. या स्टॉलना या सर्व प्रतिनिधींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.
सांताक्रुझ येथील हॉटेल ग्रँड हयात येथे जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्टॉल्सना मिळणारा प्रतिसाद याविषयी माहिती देताना कुशवाह बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे सहसंचालक सुरेश लोंढे, उपसंचालक संगीता हिवाळे उपस्थित होते.
कुशवाह म्हणाले, या स्टॉलमध्ये बिरडी कला, लातूर येथील बंजारा समाजातील विविध दागिने आणि कपडे, कोल्हापूर येथील चांदीचे दागिने आणि कोल्हापुरी चपला, औरंगाबाद येथील हिमरू शाल आणि पैठणी साड्या, सांगली येथील वाद वृंदांचा स्टॉल यांचा समावेश आहे. गेले दोन दिवसापासून जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती देण्यात येत आहे. या प्रतिनिधींकडून देखील अतिशय उत्सुकतेने विविध प्रश्न या कारागीरांना विचारले जात आहेत. तसेच विशेष कौतुकही केले जात आहे.