खासदार महोत्सवातून विदर्भाचे सांस्कृतिक वैभव वाढेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर । सह्याद्री लाइव्ह। खासदार सांस्कृतिक महोत्सवातून नवीन पीढीला व्यासपीठ मिळत आहे. अनेक कलागुण संपन्न वैदर्भीय आहेत. या सांस्कृतिक मंचातून विदर्भाचे सांस्कृतिक वैभव वाढेल, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
नागपूर खासदार सांस्कृतिक महोत्सवास आज उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागपूर व जिल्ह्यातील विविध आमदार, नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर आणि विदर्भातील जनतेच्यावतीने खासदार सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू करून एक अत्यंत चांगले व्यासपीठ कलावंतांना उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि रसिकांनाही सांस्कृतिक आनंद घेण्यासाठी एक चांगली पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देशातले आणि जगातले नावाजलेले कलाकार खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या मंचावर येत असतात आणि आपली कला सादर करीत असतात. सर्व कलाकारांना नागपूरकर प्रोत्साहन देत असल्याचे आपण अनुभवत आहोत. त्यांच्यासोबत स्थानिक कलाकारांनाही एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.