पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांतील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास वीज पुरवठा होणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यांमधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले असल्याची माहिती, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यामुळे या जिल्ह्यातील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास वीजपुरवठा होणार आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दि. ३० नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना आदेशित केले आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करताना वन्य प्राण्यांचा धोका असल्याने तसेच कृषीपंपासाठी ८ तासांच्या वीज उपलब्धतेमुळे धानपिकास पुरेशा प्रमाणात सिंचन होत नसल्याने या जिल्ह्यातील कृषीपंपांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याची विनंती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विनंतीची त्वरित दखल घेत कृषीपंपाना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी महावितरणला लेखी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याबाबत त्वरित सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या निर्णयामुळे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.