सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थीनींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्धतेबाबत सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील मुलींच्या वसतिगृहासाठी सोलापूर येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मुलींच्या वसतिगृहासाठी सोलापूर येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत शिष्टमंडळ, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मंत्रालयातील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, मराठा समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यात ही वसतिगृहे तयार आहेत किंवा जागा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी त्याचे नूतनीकरण करुन तातडीने सुरु करण्यात येतील. त्याप्रमाणे सोलापूर येथेही वसतिगृह बांधण्यात येईल.
सोलापूर येथे शिष्टमंडळाने मागणी केलेल्या जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित जागेचा ताबा कोणत्या विभागाकडे आहे, सध्या स्थिती काय आहे. यासाठी शासनस्तरावर काय करता येऊ शकते याचा आढावा घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.