पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविणाऱ्यांना जलदूत पुरस्कारांनी सन्मानित करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
नंदुरबार । सह्याद्री लाइव्ह। राज्यातील सर्व गावांमधील पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, व अभियंत्यांना जलदूत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केले.
नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या पाणीपुरवठा योजनांचा ई-भूमीपूजन सोहळा पाटील यांच्या हस्ते येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य सभापती सुहास नाईक, शिक्षण व अर्थ सभापती गणेशदादा पराडके, समाज कल्याण सभापती शंकरदादा पाडवी, पशुसंवर्धन व कृषी सभापती हेमलता शितोळे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता भुजबळ, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी निलिमा मंडपे, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक जयवंत उगले, पंचायत समितीचे सभापती मायाबाई मालसे, बबिताबाई गावीत, लताबाई वळवी, हिराताई पराडके, नानसिंग वळवी, विरसिंग ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, वर्ष 2024 पर्यंत जलजीवन मिशनच्या योजना पूर्ण करण्याचा मानस असून राज्यात 32 हजार गावांपैकी 22 हजार गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे सुरु आहेत. जलजीवन मिशनची कामे जलदगतीने होण्यासाठी ठेकेदार व पुरवठादारांची संख्या वाढविण्यात येऊन त्यांना कामे सुरु करतांना 10 टक्के रक्कम अग्रीम देण्यात येत असून ठेकेदारांनी पाणीपुरवठा योजनेची कामे वेळेत व दर्जेदार करावीत.
कोरोना काळात पाणीपुरवठा विभागाने उल्लेखनीय कामे केले असून राज्यातील पाणीपुरवठा विभागातील 374 उमेदवारांना अनुकंपा तत्वावर तसेच 862 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाणीपुरवठा विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन व थकबाकी, पदोन्नतीचे प्रश्न मार्गी लावले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच जलजीवन मिशनच्या योजना पूर्ण झाल्यावर सर्व ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे विज बिल वेळेत भरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जि.प. अध्यक्षा डॉ. गावीत म्हणाल्या की, जल जीवन मिशनची योजना विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी दुर्गम भागातील अभियंता व उप कार्यकारी अभियंताची रिक्त पदे भरण्यासह या योजनेतंर्गत ज्या ठिकाणी बोअरवेलने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे अशा ठिकाणी नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलजीवन मिशनच्या योजनेत वॉटर फिल्टरचा समावेश करण्याची मागणी त्यांनी यावेळी मंत्री महोदयांना केली.
खासदार डॉ. हिना गावीत म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तिंला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून सुरु झालेली केंद्र व राज्य सरकारचा 60-40 हिस्सा असलेली ही योजना असून घराघरातील प्रत्येक व्यक्तींला 55 लिटर पाणी प्रती व्यक्तीं, प्रती दिवस 30 वर्षांपर्यत शुद्ध पिण्याचे पाणी या योजनेतून मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी दरपत्रकात नवीन दराचा समावेश करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच पाणीपुरवठा विभागाच्या जितक्या योजना आहेत त्या प्रत्येक योजनेसाठी स्वंतत्र रोहीत्र बसविण्याची व्यवस्था करण्यासह पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी ग्रामसभेचा ठरावाची अट रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी मंत्री महोदयांकडे केली.