वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी तालुका पातळीवरही ग्रंथोत्सवाचे आयोजन करणार – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक । सह्याद्री लाइव्ह। समाजामध्ये वाचन संस्कृती वाढावी, साहित्याची ओळख व वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन केले जाते. कालानुरूप ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून शहरासोबतच तालुका पातळीवर वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बंदरे व खनिकर्ममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
आज मु.शं औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित नाशिक ग्रंथोत्सव 2022 उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्त आयुक्त जयंत नाईकनवरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, शिक्षणाधिकारी (माध्य) प्रवीण पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, ग्रंथपाल कविता महाजन, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष विक्रांत जाधव, कार्याध्यक्ष गिरीष नातू, सचिव धर्माजी बोडके, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अजय शाह यांच्यासह विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना भुसे म्हणाले की, या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचकांसाठी मांदियाळी उपलब्ध झाली आहे. कवी संमेलन, व्याख्यान, संगीत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. वाचकांच्या
आवडी–निवडीनुसार वेगवेगळया विषानुरूप पुस्तकांचे स्टॉलस् येथे लावण्यात आले आहे. नाशिक शहर आदरणीय तात्यासाहेब शिरवाडकर यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. 1840 साली स्थापन झालेल्या सार्वजनिक वाचनालयाला महान नेते, साहित्यकार, कवी यांचा ऐतिहासिक वारसा असून ग्रंथाचा अमुल्य ठेवा या वाचनालयात उपलब्ध आहे.
आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अत्याधुनिक साधनांमध्ये आपण गुंतत गेलो आहोत. परंतु जीवनात यशस्वी वाटचाल करण्याच्या द्ष्टीने वाचन करणे आवश्यक आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला वाचकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी ग्रंथोत्सवातील स्टॉलला यावेळी भेट दिली.
वाचनातून सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडतो – जयंत नाईकनवरे
यावेळी मनोगत व्यक्त करतांना शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे म्हणाले की, जे हातात पडेल ते वाचत रहावे. वाचनातून सर्वागिण व्यक्तिमत्वाचा विकास घडत जातो. विद्यार्थीदशेतच वाचनाची आवड जोपासा असा शुभेच्छापर संदेश आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी उपस्थित विद्यार्थांना दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सारडा कन्या विद्यामंदिर व मराठा हायस्कूल च्या विद्यार्थीनीनी स्वागतगीत व ग्रंथगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी केले. सुत्रसंचालन राजेंद्र ओगले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल कविता महाजन यांनी केले.
ग्रंथदिंडीने वाढविली कार्यक्रमाची शोभा
आज ग्रथोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सारडा कन्या विद्यामंदिर, रूंगठा हायस्कूल, पेठे विद्यालय, मराठा हायस्कूल, शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय, माध्यमिक विद्यामंदिर व्ही. एन. नाईक यांचे लेझीम पथक, वाय. डि. बिटको बॉईज हायस्कूल, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळया वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांच्यासोबतच शिक्षक व मान्यवर ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.