अकोला हे देशात दळणवळाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला । सह्याद्री लाइव्ह।अकोला रेल्वे स्थानक हे दक्षिण व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून येत्याकाळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
अकोला-अकोट पॅसेंजर (गाडी क्र.०७७१८) चा शुभारंभ सोहळा आज येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र.६ वर आयोजित करण्यात आला. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील या कार्यक्रमास सहभागी झाले होते. प्रत्यक्ष समारंभप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगिता अढाऊ, आमदार तथा माजी मंत्री डॉ.रणजित पाटील, आमदार वसंत खंडेलवाल, प्रकाश भारसाकळे, हरिष पिंपळे आणि रणधीर सावरकर, दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र सिंह आणि अकोला रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक शंकर शिंदे आदि उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘अकोला-खांडवा’ या रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाच्या कामातील महत्त्वाचा टप्पा म्हणून ‘अकोला-अकोट’ हा ४४ कि.मी.चा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावर आज पॅसेंजर रेल्वे सुरु होत असल्याचा आनंद आहे. ब्रॉड गेजच्या पुढच्या टप्प्यात ‘अकोट ते खांडवा’ (मध्यप्रदेश) रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होणार आहे. हा रेल्वे मार्ग पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या भागातील वन्यजीवांना तसेच येथील जैवविविधतेला त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. या रेल्वे मार्गामुळे अकोला, अमरावती, बुऱ्हाणपूर आणि खांडवा ही शहरे जोडली जाणार आहेत. उत्तरेकडील राज्यांना जोडण्यासाठी हा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
अकोला रेल्वे स्थानक हे देशाच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेतील राज्यांना जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे. आता अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे अकोला जिल्हा उत्तरेकडील राज्यांना जोडण्याच्या दिशेने महत्त्चाचा प्रयत्न आहे. रेल्वे स्थानकामुळे अकोला देशाच्या विविध भागांना जोडला जात असल्याने येत्या काळात अकोला जिल्हा देशात महत्त्वाचे दळण-वळण केंद्र म्हणून नावारूपास येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील म्हणाले, राज्य शासन व केंद्र शासनाच्या समन्वयातून राज्यातील प्रलबिंत रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याचे कार्य सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून आज सुरु झालेला ‘अकोला-अकोट’ हा ब्रॉडगेज मार्ग होय. येत्या काळात अकोल्यासह विदर्भ व मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्प मार्गी लागून दळण-वळणाची साधणे सक्षम करण्यात येतील, असे प्रतिपादन दानवे-पाटील यांनी यावेळी केले.
असा पार पडला सोहळा
दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकाचा फलाट क्र.६ आज ऐतिहासिक प्रसंग अनुभवत होता. फलाटावर सुंदर व आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले होते. मान्यवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारीगणांच्या प्रत्यक्ष उपस्थितीने वातावरणाला शोभा आली होती. यातच आज उत्सवमूर्ती म्हणून खास मान मिळालेले प्रवासीही अभिमानाने मिरवत रेल्वेगाडीत बसत होते. सुशोभित झालेली रेल्वे गाडीही हा सर्व आनंद व उत्साहाचा क्षण अनुभवत व मनात साठवून रेल्वे रुळावर थाटात उभी होती. अशात एलईडी स्क्रीनवर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवताच रेल्वे गाडीने हालचाल सुरू केली. सद्या गांधीग्राम पुलावरील दुरुस्तीच्या कामामुळे अडसर आल्याने वडसाघालून अकोला-अकोट प्रवास करणारे प्रवासी आज सुखावून गेले. त्यांना एक हक्काचा पर्याय उपलब्ध झाल्याचा आनंद जेवढा महत्त्वाचा तेवढाच अकोला- अकोट मार्गावर लागणारी सर्व गावे एका संपर्क व्यवस्थेशी जुळली गेली. यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक स्थितीला व विकासाला मोठा हातभार लागणार आहे. रेल्वे गाडी ने स्टार्ट घेतला आणि अकोला रेल्वे स्थानकाहून ही गाडी नजरेतून धुसर होताच उज्ज्वल भविष्याचा मोठा संदेश देऊन गेली.
एकूण ४४ किमी अंतर ;असे आहेत थांबे
अकोला आणि अकोट असे एकूण ४४ कि.मी. चे अंतर ही रेल्वे गाडी जवळपास १ तास २० मिनिटात पूर्ण करणार आहे. अकोला रेल्वे स्थानकाहून निघालेली गाडी ११ कि.मी. वर उगवा येथे पहिला थांबा घेईल. तेथून १३ कि.मी. वर गांधी स्मारक हा दुसरा थांबा असेल तर पुढे १० कि.मी.वर पटसूल थांबा असेल अंतिम टप्प्यात १० कि.मी. अंतर पूर्ण करून गाडी अकोट रेल्वे स्थानकावर पोहोचेल. ही रेल्वे गाडी आठ डब्यांची असून अकोला-अकोट प्रवास भाडे ३० रूपये निश्चित करण्यात आले आहे.
महिलेसह पाच तिकिट परिक्षकांना मिळाला पहिला मान
अकोला-अकोट रेल्वे मार्ग ब्रॉडगेज झाल्यानंतर या मार्गाहून धावलेल्या पहिल्या अकोला-अकोट पॅसेंजर (गाडी क्र.०७७१८) मध्ये तिकिट परिक्षकाचा मान महिलेसह एकूण पाच तिकिट परिक्षकांना मिळाला. यात मुख्य तिकिट परीक्षक सुरेश इंगोले तसेच तिकिट परीक्षक प्रविणा गोने, कैलाश वानखडे, मोहन गटकर आणि प्रशांत बुचुंडे यांचा समावेश होता.