Chakan Crime : उमरग्यातील महिलेचा प्रेमसंबंधातून खून; प्रियकरास पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरी; कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी तपास करून आरोपीस केले गजाआड
– प्रसन्नकुमार देवकर
चाकण, (महाळुंगे इंगळे) । सह्याद्री लाइव्ह । खराबवाडी (ता. खेड) येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील महिलेचा प्रेमप्रकरणातून प्रियकराने चाकूने गळा कापून आणि दगडाने ठेचून विद्रुप केला. खुनाचे गुन्हयातील आरोपीस पिंपरी–चिंचवड गुन्हे शाखा युनिट–३ च्या पोलीस पथकाने कोणताही सुगावा नसताना कौशल्यपूर्ण तपास करून २४ तासांत गजाआड केले.
निकीता संभाजी कांबळे (वय २८, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी राम कुंडलिक सूर्यवंशी (वय ३९, रा. पवारवस्ती, साईबाबा मंदिर, दापोडी, पुणे) यास पोलिसांनी पुण्यातील सिम्बायोसिस परिसरातून शिताफीने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी अर्थात २० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.३० च्यापूर्वी म्हाळुंगे चौकी हददीतील मौजे खराबवाडी (ता. खेड, जि. पुणे) गावचे हद्दीत वानव्याचा मळ्याच्या पूर्वेकडील विनायक रेवजी खराबी यांचे मालकीची जमीन गट नंबर ३८६ मध्ये दक्षिण दिशेला असणारे भैरोबा ओढ्या लगतचे बांधावरील झुडपामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन वय वर्षे २२ ते २७ वर्षे वयोगटातील अनोळखी स्त्रीचा चाकूने गळा कापून व चेह–यावर दगड टाकून तिचा खून केला.
याबाबत चाकण पोलीस ठाण्याच्या महाळुंगे पोलीस चौकीत अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्हयातील अनोळखी मयत महिलेचा चेहरा पूर्णपणे ठेचून विद्रुप केल्यामुळे ओळख पटत नव्हती. या गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पिंपरी–चिंचवड पोलीस उपआयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व गुन्हे शाखा युनिट ३ यांचेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना वेगवेगळया टीम तयार करुन गुन्हा उघडकीस आण्ण्याकरिता मार्गदर्शन सूचना दिलेल्या होत्या.
मयताची ओळख पटवून गुन्हा उघड करणे बाबत चाकण, खराबवाडी परीसरात अधिक तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट ३ कडील पथकाने या परिसरातील ९० सीसीटीव्हीची तपासणी केली. तसेच या महिलेची ओळख पटविण्याकरिता परिसरातील घरमालक, घरभाडेकरु, कंपनीतील कामगार, सुपरवाझर, स्थानिक नागरिकांकडे सखोल चौकशी करीत असताना पोलीस नाईक ऋषिकेश भोसुरे व पोलीस शिपाई राजकुमार हनमंते यांना त्यांचे खास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. सदर मयत महिला ही खराबवाडी येथील हनुमान मंदिरामागील पाण्याच्या टाकीजवळील दिलीप गुलाब खराबी यांच्या १५ नंबरच्या खोलीत राहण्यास असून, ती शनिवार रात्रीपासून मिळून आलेली नाही.
तेव्हा त्याबाबत तात्काळ वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड गुन्हे शाखा युनिट ३ यांना माहिती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे पोलीस पथकाने या महिलेच्या नातेवाईकांना संपर्क करुन महिलेचे नाव निकीता संभाजी कांबळे ( वय २८, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद ) असे असल्याबाबत समजले.
तसेच महिलेचा मोबाईल नंबर प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषात्मक तपास करुन घटनेच्या अगोदर या मयत महिलेस झालेले कॉलवरुन संशयित राम कुंडलिक सूर्यवंशी याचा पुणे येथील सिम्बॉयसेस परिसरातून शोध घेवून त्यास शिताफिने ताब्यात घेतले.
त्याचेकडे तपास केला असता प्रथमतः त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून या मयत व्यक्ती ही माझी जवळीची मैत्रिण असून, तिला कोणी मारले? असा कांगावा करुन दुःख झाल्याचे भासवून मोठमोठ्याने रडून तपास पथकाची पूर्णपणे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु युनिट ३ कडील तपास पथकाने संशयित आरोपीकडे तपास केल्याने संशयित आरोपी याने हा गुन्हा केल्याचे कबुली दिली.
त्याने माहीती दिली की, सदर मयत महीला निकीता कांबळे हिचे व आरोपीचे पूर्वी एकत्र एल्प्रो मॉल चिंचवडमध्ये काम करीत असताना ओळख होवून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी निकीता कांबळे हिचे अजून कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याबाबत आरोपी राम सूर्यवंशी यास संशय आला. तसेच राम सूर्यवंशी यांचे लग्न झाले असल्यामुळे त्याचे घरातील लोकांना या प्रेमसंबधाबाबत माहिती झाली होती. त्यामुळे राम सूर्यवंशी याची पत्नी त्याचे सोबत बोलत नव्हती. तसेच निकीता कांबळे देखील त्याचेशी न बोलता दुर्लक्ष करीत होती. त्यामुळे रागाचे भरात निकीता कांबळे हिचा खून केल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली.
अशाप्रकारे अनोळखी मयताची ओळख पटवून अज्ञात आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तपास करुन व माहिती काढण्यासाठी पारंपारीक पध्दतीचा कौशल्यपूर्ण वापर केला तसेच अचूक तांत्रिक विश्लेषण केले. परिणामी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. या आरोपीस म्हाळुंगे चौकी, चाकण पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई ही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदू आढारी, सचिन मोरे, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, अंकुश लांडे, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधीर दांगट, महेश भालचिम, विठठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे, रामदास मेरगळ, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी, राजेंद्र शेटे यांनी केली आहे.