पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र परिसरातील लघुउद्योगांच्या समस्या तातडीने सोडविणार – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे । सह्याद्री लाइव्ह। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेतर्फे मोशी येथे आयोजित उद्योजक मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र परिसरातील लघुउद्योजकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात येतील अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली
कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, संस्थापक अध्यक्ष तात्या सपकाळ, सुरेश म्हेत्रे, जयंत कड, अजय भोसले, लघुउद्योजक उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, छोटा उद्योग हा मोठ्या उद्योगांचा पाया आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांप्रमाणे लहान उद्योगांनाही महत्व देण्यात येईल. स्थानिक नागरिकांना उद्योजकांनी रोजगार द्यावेत यासाठी त्यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येईल. पिंपरी चिंचवड लघू उद्योजकांच्या मागण्यांवर लवकरच विविध विभागांच्या प्रमुखांची विस्तृत बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येईल
पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत भंगार व स्क्रॅपची दुकाने हटविण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महावितरणने उद्योगांची वीज वारंवार खंडित करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लघु उद्योजकांची सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ८ लाख ७६ हजार ७०३ रुपयांचा धनादेश उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
आमदार महेश लांडगे यांनीही यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातील लघू उद्योजकांच्या समस्या मांडल्या.