अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा रमेश लटके विजयी
मुंबई उपनगर। सह्याद्री लाइव्ह। महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६- अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी पार पडली. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या या मतमोजणी प्रक्रियेत एकूण 66,530 मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा रमेश लटके विजयी झाल्या आहेत अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील केली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल उपस्थित होते. त्यानंतर पाटील यांनी विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.
अंधेरी पूर्व’ या विधानसभा मतदारसंघाच्या सर्व 256 केंद्रांवर दिनांक 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या मतदान प्रक्रियेत एकूण 31.75 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. आज या मतदानाच्या मतमोजणीस सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. प्रारंभी टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर एकूण 19 फेऱ्यांमध्ये ई. व्ही. एम. द्वारे मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माध्यमांना मतमोजणी प्रक्रियेची तात्काळ माहिती मिळण्याच्या दृष्टीने माध्यम कक्षही स्थापन करण्यात आला होता.