पुण्यात येत्या ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी महावितरणच्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
पुणे । सह्याद्री लाइव्ह । महावितरणच्या पुणे परिमंडलद्वारे आयोजित पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे सोमवारी (दि. ७) व मंगळवारी (दि. ८) बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तीन नाट्यकृती सादर केली जाणार आहे. महावितरणमधील रंगकर्मींच्या दर्जेदार अभिनयाची मेजवानी देणाऱ्या नाट्यकृती पाहण्यास प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
महावितरणमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आंतरपरिमंडलीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षांनंतर यंदा नाट्यस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. ७) सकाळी १०.३० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ ही नाट्यकृती सादर होईल. हे नाटक जी. ए. कुलकर्णी यांच्या मूळ कथेचे नाट्यरुपांतर आहे. तर दुपारी ३.१५ वाजता बारामती परिमंडलाकडून रत्नाकर मतकरी लिखित ‘ब्लाईंड गेम’ नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल.
नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता पुणे परिमंडलद्वारे प्र. ल. मयेकर लिखित ‘सवाल अंधाराचा’ ही नाट्यकृती सादर केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर होईल. विजेत्या नाट्यसंघास करंडक तर विजेत्या कलाकारांना वैयक्तिक पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. या आंतरपरिमंडलीय स्पर्धेतील विजेता नाट्यसंघ कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.