भारतीय संस्कृतीमधील दिवाळीचे महत्व
सह्याद्री लाइव्ह। भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सवांना अनन्यसाधारण महत्व आहे. या सण, परंपरांमुळे भारतीय प्राचीन संस्कृतिच्या समृद्धीचा प्रत्यय येतो. धर्म, पंथ, भाषा, रंग अशा सर्व विविधतेच्या नागरिकांना ‘भारतीय’ या एका संज्ञेखाली घेऊन त्यांच्यात प्रेम, आपुलकी आणि एकोपा निर्माण करण्याचं काम हे सण करत असतात. वातावरणात चैतन्य निर्माण करणारे हे सण साजरे करण्यामागे धार्मिक, वैज्ञानिक अशी अनेक कारणं असतील, पण सर्वात महत्वाचं कारण म्हणाल तर ते सामाजिक बांधिलकी जपणं हेच आहे. अशा या भारतीय हिंदू सणांपैकी दिवाळी हा सण सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ साजरा केला जातो. दिवाळी हा सण इतका लोकप्रिय आहे की भारतासह अनेक देशांमध्ये हा सण लोक आता आवडीने साजरा करू लागली आहेत.
जीवनातील अंधकारावर मात करत माणसाच्या आयुष्यात असंख्य दिव्यांच्या प्रकाशात सुख-समृद्धी घेऊन येणारा असा हा सण आहे. या सणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे पाच दिवस खूप महत्वाचे मानले जातात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच पाच दिवसांबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत.
घराबाहेर उंचावर आकाश कंदिल, दरवाज्याला तोरण, उंब-यात रांगोळी आणि सगळीकडे प्रकाश पसरवणा-या असंख्य पणत्या, अशा मंगलमय वातावरणात, फटाक्यांच्या आतिषबाजी, दिव्यांचा झगमगाटात अश्विन कृष्ण द्वादशीला या दीपोत्सवाची सुरूवात होते.
वसुबारस म्हणून दिपावलीचा पहिला दिवस साजरा केला जातो. या दिवशी गायी आणि वासरांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवतात. हिंदू मान्यतेप्रमाणे ३३ कोटी देवांचा वास असणा-या या कामधेनूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. दिवाळी या सणाचा महत्वाचा आणि दुसरा दिवस या दिवशी लक्ष्मीमाता आणि धन्वंतरी समुद्रमंथनामधून प्रकट झाले होते. त्यामुळे धनाची म्हणजेच धनलक्ष्मी मातेची पूजा आज केली जाते. लोक यादिवशी आपल्या धन-संपत्तीची पूजा करतात.
अश्विन महिन्याचा अमावस्येचा दिवस लक्ष्मीपूजन म्हणून साजरा केला जातो. दीपावली उत्सवाचा सर्वात महत्वाचा असा सण मानला जातो. लक्ष्मी मातेच्या सगळ्या स्वरूपांची पूजा या दिवशी केली जाते. दिवाळी फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. रूद्रावतार धारण केलेल्या लक्ष्मी मातेचा भगवान शंकरांच्या स्पर्शाने क्रोध शांत झाला होता, अशी अख्यायिका आजच्या दिवसाबद्दल सांगितली जाते.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडवा. या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. शेतकरी, पशुपालक या दिवशी गाई-म्हशींची पूजा करतात. व्यापारी, दुकानदार या दिवशी वहीपूजन करून नव्याने व्यावसायाला सुरूवात करतात. या दिवशी गुजराती नवीन वर्ष सुरू होत असल्यामुळे वर्षाची नवी सुरूवात गुजराती व्यावसायिक लोक वहीपूजन करून करतात.
दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊ बहिणीच्या नात्याला समर्पित असा हा दिवस या दिवशी बहीण भावाला औंक्षण करून त्याच्या खुशहालीची कामना करते.
दिवाळी फराळ, भेटवस्तू अशा ब-याच गोष्टी या सणाला लोकांमधील संबंध घनिष्ट करतात. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देत लोक हा आनंदमय सण साजरा करतात. प्राचिन काळापासून नवी पिके काढल्यानंतरचे हे शरद ऋतुचे हे दिवस अतिउत्साहात दिवाळी म्हणून साजरे केले जात आहेत. प्रभु रामचंद्र रावणाचा वध करून १४ वर्षांच्या वनवासांनतर आयोध्येत परतले. पापावर पुण्याचा झालेला विजय म्हणून त्यांच्या आगमनानंतर दिवाळी साजरी केली जाते, अशीही अख्यायिका आहे.
आपल्या सर्वांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा!