पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांचा आढावा
जालना | सह्याद्री लाइव्ह | जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 व 2022-23 अंतर्गत कामांचा सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्हयाचा समतोल व सर्वांगिण विकास होण्यासाठी सर्व आठही तालुक्यांमध्ये विकासाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत मागील व चालू वर्षातील जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांची सदयस्थिती, प्रलंबित कामे व करण्यात येणारी कामे याबाबतची माहिती जाणून घेतली. त्यानंतर इतर विभागांचा आढावा घेण्यात आला.
पालकमंत्री सावे म्हणाले की, चालू वर्षातील विकास कामांचा लवकरात लवकर प्रस्ताव तयार करुन त्याची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी. सर्व तालुक्यांत समतोल कामे घेण्यात येऊन सर्वांगिण विकास साधला जावा. शिक्षण व आरोग्य विभागाने प्राधान्याने वेळेत कामे पूर्ण करावीत. कामांमध्ये दिरंगाई करु नये. संपूर्ण निधी विकास कामांवर वेळेत खर्च करण्यात यावा. तसेच झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. वीज वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विदयुत विभागाची नियमितपणे बैठक घेण्यात येऊन समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे. जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी त्वचा रोगाबाबत शासन गंभीर असून या रोगाच्या निवारणासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल, असे त्यांनी सांगितले.