प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून देण्यासाठीचा उपक्रम राबवणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी । सह्याद्री लाईव्ह । राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले तर ते जास्त चांगले होणार आहे. या बोली भाषेच्या माध्यमातूनच मग त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेल्यास त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होईल. त्यामुळे अशा प्रकारे स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पुस्तकांची निर्मिती डाएटमार्फत करण्यात यावी अशा सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी आज दिल्या. सावंतवाडी येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
यावेळी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, रत्नागिरी डाएटचे प्राचार्य गजानन पाटील, सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, सिंधुदुर्ग डाएटच्या प्राचार्य अनुपमा तावशीकर, रत्नागिरीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे आदी उपस्थित होते.
मुलांचा कल ८ वी पासूनच ठरवण्यात यावा अशा सूचना करुन शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेमध्येच व्यावसायिक शिक्षणाविषयी गोडी निर्माण करता आली पाहिजे. त्यांना स्थानिक भाषेतून शिक्षण दिले पाहिजे. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे ही काळाची गरज आहे. असे सुप्त गुण हेरून त्यावर शिक्षकांनी काम केले पाहिजे. त्यासाठी एक प्रकल्प तयार करण्यात यावा. हा प्रकल्प राज्यभर राबवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल याचा अभ्यासही करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सुरुवातीस कोल्हापूर उपसंचालक चोथे यांनी कोल्हापूर विभागाचा आढावा सादर केला. त्यामध्ये विभागातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांची पदे, रिक्त पदे, राबवण्यात येणारे विविध उपक्रम, शाळांची स्थिती यांचा समावेश होता. तर शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी डाएट आणि सिंधुदुर्ग व रत्नागिरी विभागांचा स्वतंत्र आढावा घेतला. त्यामध्ये रिक्त पदांसोबतच कोकणी भाषेतून इयत्ता 1 ली व 2 रीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, शाळांमधील मुलभूत सोयी, पुस्तकांसोबत मुलांना शाळेमध्ये वह्यांचे वाटप कसे करता येईल या गोष्टींचा समावेश होता.