कोयना प्रकल्पांतर्गत पर्यटन विकासाची कामे तातडीने पूर्ण करा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
सातारा । सह्याद्री लाईव्ह । महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी 214 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्याच भेटीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
महाबळेश्वर येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रस्ताव मंत्रालयस्तरावर प्रलंबित असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. या प्रस्तावांची एकत्रित यादी करुन द्यावी, हे प्रस्ताव संबंधित विभागाचे मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ मार्गी लावले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच जिल्ह्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्राप्त झालेल्या निधीतून दर्जेदार कामे करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
सातारा जिल्ह्यातील दळणवळण सोयीचे होण्यासाठी रस्त्यांचे जाळे उभे करा, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला केली. तसेच महाबळेश्वर येथील वाहन पार्कींग व्यवस्थेचा कायमस्वरुपी प्रश्न मिटावा, यासाठी एसटी डेपो आणि रे गार्डन येथे वाहनतळ उभारण्यासाठी निधी दिला जाईल असेही स्पष्ट केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून 17 प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करावीत असेही त्यांनी सुचवले. महाबळेश्वरसोबतच लगतच्या परिसरातही पर्यटन वाढीसाठी मोठी संधी असून त्यासाठीही प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. महाबळेश्वर सोबतच जिल्ह्यात इतर ठिकाणी पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी विभागीय अधिकारी दर्जाचे पद साताऱ्यात निर्माण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठीही विभागीय अधिकारी दर्जाचे पद निर्माण करण्यात येईल असेही स्पष्ट केले.
पुस्तकाचं गाव भिलार हे ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. मात्र त्याचा दर्जा बदलून ते ‘ब’ दर्जाचे पर्यटनस्थळ करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. उन्हाळ्यामध्ये तापोळा परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशा ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी कसे मिळेल याचेही सर्वेक्षण करण्यात यावे. प्रतापगड संवर्धनाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, त्यासाठी नक्की निधी दिला जाईल असेही त्याने नमूद केले. सुरुर वाई ते पोलादपूर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य, रस्ते विकास, रोजगार सुविधांसह जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.