दिग्गज पुरस्कारार्थींमुळे राजर्षी शाहू पुरस्काराची उंची वाढली – पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर : राज्यातील अनेक दिग्गज व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्काराने आजवर गौरविण्यात आले आहे. भाई माधवराव बागल, व्ही.शांताराम, जयंत नारळीकर, प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉ. रघुनाथ माशेलकर अशा अनेक दिग्गजांना आजवर शाहू पुरस्कार प्रदान केला आहे. डॉ. जनार्दन वाघमारे आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारख्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना पुरस्कार दिल्यामुळे राजर्षी शाहू पुरस्काराची उंची वाढत आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले.
राजर्षी शाहू कार्य व विचार वृध्दींगत करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांना सन 2020 साठी तर डॉ. जनार्दन वाघमारे यांना सन 2022 साठी राजर्षी शाहू पुरस्काराचे वितरण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वितरीत करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते. शाहू स्मारक भवन येथे आयोजित राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने 148 व्या राजर्षी शाहू जयंती उत्सवात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल रेखावार, डॉ.तात्याराव लहाने यांच्या पत्नी सुलोचना लहाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, ज्येष्ठ इतिहास तज्ञ तथा ट्रस्ट चे सदस्य डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ट्रस्टचे सचिव दत्तात्रय कवितके, कार्यकारी अभियंता संजय पाटील, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असणारे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले. केवळ 28 वर्षांच्या कारकिर्दीत 280 वर्षांचं कार्य त्यांनी केले. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य इतके मोठे आहे की कितीही पुस्तके लिहिली तरी शाहू राजांच्या कार्याचं वर्णन पूर्ण होणार नाही.
पालकमंत्री पाटील म्हणाले, विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्कार देऊन आजवर सन्मानित करण्यात आले आहे. राजर्षी शाहू पूरस्कारार्थी डॉ. वाघमारे व डॉ. लहाने यांचेही कार्य उल्लेखनीय आहे.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांनी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करताना अनेक उपक्रम सुरु केले. यापैकी गुणवत्ता वाढीचा ‘लातूर पॅटर्न’ हा उपक्रम राज्यभर प्रसिध्द आहे. शिक्षण, समाजप्रबोधन, राजकारण, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रात डॉ. वाघमारे यांचे कार्य महत्वपूर्ण आहे.
एड्स रुग्णाच्या डोळ्यांची पहिली शस्त्रक्रिया डॉ. तात्याराव लहाने यांनी केली असून तब्बल 50 लाख लोकांचे डोळे त्यांनी आजवर तपासले आहेत. कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जडणघडणीत डॉ. लहाने यांचा मोठा वाटा आहे. इतके मोठे कार्य करणाऱ्या दोन्ही मान्यवरांची समितीने पुरस्कारासाठी निवड केली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर यापुढेही केला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
राजर्षी शाहू महाराजांच्या लोकाभिमुख विचारांनी समाजाची वाटचाल होणे आवश्यक – श्री शाहू महाराज छत्रपतीराजर्षी शाहू महाराजांच्या लोकाभिमुख विचारांनी समाजाची वाटचाल होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री शाहू महाराज छत्रपती यांनी केले.
श्री शाहू महाराज छत्रपती म्हणाले, सध्या समाज भरकटत असताना समाजाला योग्य दिशा देण्याचं आव्हान समोर आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित होवून कार्य करणाऱ्या व्यक्ती व राजर्षी शाहू पुरस्काराच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन मिळते. या माध्यमातून यापुढेही समाजाला मार्गदर्शन होण्याची गरज आहे.
पुरस्कारार्थी डॉ.जनार्दन वाघमारे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात क्रांती केली. शाहू महाराजांच्या कार्यामुळेच कोल्हापूर संस्थानची देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली. शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे प्रतिक होते. राजसत्तेचा वापर त्यांनी सामाजिक न्यायासाठी केला. लोकशाहीचा वापर राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रासाठीही व्हायला हवा. लोकशाही ही व्यापक संकल्पना आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वांना समान न्याय, प्रतिष्ठा, मूलभूत अधिकार ही मूल्ये राज्यघटनेने दिली असून ही सर्व मूल्ये शाहू राजांची होती, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. शाहू राजाचं कर्तृत्व मोठं होतं, त्यांनी आधुनिक युग आणलं. शाहू महाराजांकडे मूल्यांचे साम्राज्य होते, असे सांगून शाहू महाराजांचे नाव केवळ इमारतींना देऊन भागणार नाही, तर त्या इमारतींमधून शाहू राजांचे विचार आणि कार्य जोपासायला हवे. शाहू राजांचे विचार अंमलात आणण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कारार्थी डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, दैनंदिन आयुष्य जगताना विज्ञानाची कास धरा. समतोल आहार घेतल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब आजार टाळून निरोगी जीवन जगता येईल. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहारात अ जीवनसत्वाचा समावेश करा. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे विकार वाढत आहेत, मोबाईलचा अनावश्यक वापर टाळा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राजर्षी शाहू महाराज ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. सन 1984 पासून सुरु झालेल्या पुरस्कार सोहळ्यात आतापर्यंत 33 पुरस्कार देण्यात आले आहेत. समाजप्रबोधन, साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आजवर शाहू पुरस्काराने गौरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सन्मानपत्राचे वाचन दत्तात्रय कवितके यांनी केले. आभार राजदीप सुर्वे यांनी मानले.