५० कोटी रुपयांचा ‘आव्हान निधी’ मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री अब्दुल सत्तार
धुळे : जिल्हा वार्षिक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 50 कोटी रुपयांचा ‘आव्हान निधी’ मिळणार आहे. हा निधी मिळवून धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यान्वयीन यंत्रणांनी कालबद्धरित्या प्रक्रिया राबवावी, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेच्या कार्यकारी समितीची बैठक आज दुपारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री सत्तार हे मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले, की जिल्हा वार्षिक योजना 2021- 22 चा 99 टक्के निधीचा विनियोग केला आहे. आता 2022- 23 या आर्थिक वर्षात ‘आव्हान निधी’ प्राप्त करण्यासाठी सर्व विभागांनी सांघिक प्रयत्न करावेत. कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत. जिल्हा वार्षिक योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेवून योजनेच्या कामांना गती द्यावी. तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्य अग्निश्यामक यंत्रणेची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने राबवावी, अशाही सूचना पालकमंत्री सत्तार यांनी दिल्या.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दक्षता बाळगावी. साथीचे आजार पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी. साथीचे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खते वेळेत मिळतील, असे नियोजन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, की जिल्हा वार्षिक योजनेच्या कार्यान्वयीन यंत्रणांची तीन दिवसांपूर्वीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला असल्याचे सांगितले.