छत्रपती शिवरायांचा लोक कल्याणकारी समृद्व वारसा जपण्यासाठी कटिबद्ध होवू – पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्वार्थाने सुराज्य होते. प्रजेच्या कल्याणाचा वसा त्यांनी आयुष्यभर जपला. बहुजन हिताय, बहुजन सुखाय याची प्रचिती रयतेने अनुभवली. लोक कल्याणाचा, शेतकरी, कष्टकरी, बहुजनाच्या हिताचा समृद्व वारसा ग्रामीण भागापर्यत या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने पोहचवित आहोत. या दिनाच्या निमित्ताने सर्वानी प्रेरणा घेत लोककल्याणाप्रती कटिबद्ध होण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शुभ संदेशात केले.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज शिवस्वराज दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे व मान्यवरांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करण्यात आले. यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मनपाचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशान विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कृषी अधिकारी टि.जी. चिमनशेट्टे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत आहेत. आई जीजाऊच्या मार्गदर्शनाखाली बालपणापासूनच त्यांनी शौर्याचे धडे गिरवत स्वराज्याचे तोरण बांधले. हे राज्य सुखी व्हावे, हे राज्य रयतेचे व्हावे यासाठी त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे 6 जून 1674 रोजी स्वराज्याचे तोरण बांधले. एका समृध्द्व नितीचा, जनकल्याणाचा वारसा त्यांनी आपल्याला दिला आहे. हा वारसा प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत, पंचायत समिती मार्फत, जिल्हा परिषदेमार्फत आपण आज सर्वांपर्यत अप्रत्यक्षरित्या पोहचवित आहोत. या दिनापासून आपण सर्वजण प्रेरणा घेवू या शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाहीर रमेश गिरी व संचानी महाराष्ट्र गीत सादर केले. फत्तेपुर येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.