अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतला विविध विषयांचा आढावा
अकोला : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेतला. डॉ.शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा उपायुक्त पंकज जवजाळ, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सागर तेरकर, विनय सुलोचने, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, माजी आमदार हरिभाऊ भदे, सामाजिक कार्यकर्ता आशाताई मिरगे आदी उपस्थित होते.
वीटभट्टी व्यावसायिकांना आवश्यक परवाना सहज व त्वरित मिळेल याकरीता प्रशासनाने उपाययोजना राबवावी. लोकप्रतिनिधींद्वारे राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांकरिता प्रशासनाने समन्वय राखावा, विधवा महिलांना पेन्शन, जिल्ह्यातील गुटखा व अवैध ड्रग विक्रीवरील कार्यवाही इ. विषयांचा आढावा घेऊन यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
डॉ. शिंगणे यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात गुटखा विक्री प्रकरणी कारवाई करावी. त्यासाठी विशेष पथक निर्माण करुन जिल्हात धाडसत्र राबवावे. गुटखा विक्री बाबत गोपनीय माहिती देणाऱ्या खबरी व्यक्तींचे जाळे अधिक मजबूत करुन पोलीस प्रशासनाच्या मदतीने गुटखा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करावी. जिल्ह्यातील वीटभट्टी व्यावसायिकांसाठी सुलभ नियमावली करुन त्वरित परवाना मिळेल यासाठी नियोजन करावे, असे निर्देश डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले.