गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता‘पिझोमीटर’ भूजलमापक यंत्राचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
अमरावती : अटल भूजल योजनेतंर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्यासाठी पिझोमीटर (भूजल मापक यंत्र) बसविण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज पिझोमीटरचे उद्घाटन करण्यात आले.
सरपंच ललिता जोमदे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे प्रादेशिक उपसंचालक संजय कराड, मोर्शीचे तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी आर. पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अत्याधुनिक पध्दतीने गावातील भूजल पातळीच्या अभ्यास करण्याकरिता अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड, मोर्शी व चांदुरबाजार या तालुक्यामध्ये एकूण 90 ग्रामपंचायतीमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पिझोमीटरसाठी स्थळ निश्चित करण्यात आले आहे. जमिनीतील भूशास्त्रीय रचनेनुसार जलधारक खडकाचा अभ्यास व तसेच भूजल पातळीचा अभ्यास अत्याधुनिक पध्दतीने करण्याकरिता पिझोमीटरने (भूजल मापक यंत्र) खोदकाम करण्यात येणार आहे व त्यावर (डिजीटल वॉटर लेवल रेकॉर्डर) बसविण्यात येणार आहे. यामुळे गावाला भूजल पातळीची नोंद दर 12 तासाला घेता येईल, अशी सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच या योजनेतंर्गत अमरावती जिल्ह्यातील एकुण 90 ग्रामपंचायत मध्ये 90 पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येणार आहे. तसेच या यंत्राद्वारे गावामध्ये दरदिवशी किती पाऊस पडतो, हे मोजमाप कशाप्रकारे करतात, याचे प्रात्यक्षिक या कार्यालयमार्फत गावातील जलसुरक्षक यांना देण्यात येईल. पर्जन्यमापक यंत्र व भूजल मापक यंत्राचा उपयोग करुन गावाचा ताळेबंद अधिक अचूकतेने करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.