मावळ तालुक्यात ‘विकेल ते पिकेल’ अभियान फायदेशीर!
मावळ : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) ‘विकेल ते पिकेल अभियान’ कृषि विभागामार्फत गेल्या तीन वर्षांपासून राबवले जात आहे. मावळ तालुक्यात हे अभियान शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे दिसत आहे. चांदखेड येथे मावळ तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी प्रगतशील युवा शेतकरी नितीन गायकवाड यांच्या “कलिंगड पिकांची लागवड व शेतावर च विक्री व्यवस्थाची पाहणी केली. “विकेल ते पिकेल” अभियान यशस्वी होत असल्याने समाधान व्यक्त केले.
चांदखेड येथे नितीन गायकवाड यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात कलिंगड पिकासोबत मिरची आंतरपीक म्हणून लागवड केली, त्यासाठी त्यांना एक लाख खर्च आला. यामधून त्यांना आतापर्यंत कलिंगड विक्रीतून दोन लाख रुपये मिळाले आहेत. हंगाम संपेपर्यंत अजून दोन लाख रुपये मिळतील तसेच त्यांना मिरची पिकाच्या विक्रीतून रोज दहा हजार रुपये मिळतात.
एका हंगामात या दोन पिकांपासून त्यांना चार लाख निव्वळ नफा मिळणार आहे. या पिकाबरोबरच ते काकडी, खरबूज पिकांची पण विक्री करतात. त्यातून ही चांगले उत्पादन येते व नफा मिळतो. कृषिसहाय्यक मनीषा घोडके, कृषिपर्यवेक्षक नंदकुमार साबळे, मंडळ कृषि अधिकारी दत्तात्रय शेटे यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन होत असल्याचे नितीन गायकवाड यांनी सांगितले.
विक्री होणारा शेतमाल, भाजीपाला, ताजी फळे ही स्थानिक शेतकर्यांची ताजी व स्वच्छ असल्याने नागरिकांनी प्रथम शेतकऱ्यांकडून फळे, भाजीपाला खरेदी करावा.
– दत्तात्रय पडवळ, तालुका कृषी अधिकारी, मावळ