स्थानिकांना रोजगारासह अर्थचक्रास चालना मिळणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात बांधल्या जाणाऱ्या कौशल्य विकास केंद्रातून स्थानिकांना रोजगार संधी निर्माण होण्यासोबतच स्थानिक अर्थचक्रास गती मिळण्यास मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
या विकास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन यावेळी सामंत यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यात शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने हे केंद्र मदत करेल असे सांगून ते म्हणाले की कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात या स्वरुपाचे केंद्र माझ्या खात्यातर्फे उभारण्यात येईल तसेच दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे गाव असणाऱ्या तासगाव येथे देखील असेच केंद्र उभारले जाईल.
शासकीय तंत्रनिकेतन परिसरात हे केंद्र बांधले जाणार आहे. त्या इमारतीचे काम 9 महिन्यात पूर्ण होईल व नंतरच्या काळात प्रतिवर्षी 5 अभ्यासक्रम असे 15 कौशल्य अभ्यासक्रम येथे सुरु करण्यात येणार आहे. हे राज्यातील पहिलेच केंद्र असून येथे पुढील 3 वर्षात क्षमतावृध्दी करीत साधारण 3000 विद्यार्थी प्रतिवर्षी हे कौशल्य प्राप्त करायला सुरुवात होईल.
स्थानिक ठिकाणची गरज लक्षात घेऊन येथे पर्यटन,हॉटेल,कृषी आणि अन्न अभियांत्रिकी आदि अभ्यासक्रम सुरु होत आहेत. ज्यातून स्थानिक उद्योगास असणारे मनुष्यबळ आणि रोजगार यांची सांगड घातली जाईल. आगामी काळात रत्नागिरी विमानतळ सुरु झाल्यावर त्या व्यवसायाला कौशल्य अभ्यासक्रमांना देखील यात सामिल करण्यात येणार आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणात हा सोहळा झाला. याला उद्योग जगतामधील व्यक्तींची देखील उपस्थिती असावी असे नियोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास स्थानिक उद्योजक दीपक गद्रे (गद्रे मरीन्स), तरुणकांत दवे (जेएसडब्लूचे वरीष्ठ उपाध्यक्ष), एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष दीगंबर मगदूम, संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ, राज्य तंत्रशिक्षण महामंडळाचे डॉ. विनोद मोहितकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. विनोद मोहितकर यांनी तर सूत्रसंचालन पूर्वा पेठे हिने केले .