नेरला व खापरी येथील नागरी सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम
भंडारा : पुनर्वसनाच्या कामातील अडचणी गतीने दूर करून पुनर्वसीत नेरला व खापरी येथील नागरी सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज दिले.पवनी तालुक्यातील वाही येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीला आमदार ॲड. अभिजीत वंजारी, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, गोसे खुर्द प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अकुंर देसाई यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोसेखुर्दच्या संपूर्ण संच स्तरापर्यत पाणी साठवण्यासाठी कुटुंब स्थंलांतराची सद्यस्थितीचा कदम यांनी आढावा घेतला. विदर्भ पाटबंधारे विभागाच्या वतीने यावेळी प्रकल्पाची सद्यस्थिती दर्शवणारे सादरीकरण करण्यात आले. 80 टक्के कुटुंबाचे पुनर्वसन झाले असून खापरी व नेरलाच्या बाबतीतही अडचणी सोडविण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील 34 बाधित गावठाणांपैकी 28 गावठाणांचे पुनर्वसन झाले आहे. 23 गावांमध्ये नागरी सुविधा पुर्ण करून ती गावे जिल्हा परिषदेला हस्तांतरीत करण्यात आले आहेत तर 18 गावांना महसुली गावांचा दर्जा मिळाला आहेत. स्थलांतरीत 4 हजार 721 कुटुंबापैकी 2 हजार 806 कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे.
प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2023 हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने नियोजन करून अधिकाऱ्यांनी काम करण्याचे निर्देश कदम यांनी दिले. प्रकल्प पुर्ण करण्याकरीता 1500 कोटी रूपयांचा निधीची आवश्यकता असून याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर गोसेखुर्द मुख्य धरणाची पाहणी त्यांनी यावेळी केली. अधिक्षक अभियंता अकुंर देसाई यांनी प्रकल्पाच्या कामाविषयी माहिती दिली.
प्रकल्पाच्या प्रमुख उपलब्धी : जानेवारी 2022 अखेर 1146.075 द.ल.घ.मी म्हणजे 100 टक्के इतका जलसाठा निर्मित करण्यात आला. तर मार्च अखेर 145960 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली. गोसीखुर्द धरण पायथ्याशी 24 मे. वॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प डिसेंबर 2017 मध्ये तर उजव्या कालव्यावरील 2.50मे.वॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प नोंव्हेबर 2019 अखेर कार्यान्वित करण्यात आला आहे.लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर मोहिमेचा प्रसिध्दी अहवाल पालकमंत्र्यांना सादर
महाविकास आघाडी शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 9 ते 17 मार्च 2022 या कालावधीत लोककलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण 63 गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा प्रसिध्दी अहवाल जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी विश्रामगृह भंडारा येथे सादर केला.
जिल्ह्यातील सातही तालुक्यात बाजारपेठेच्या गावी शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी लोककला आणि पथनाट्यांचा वापर प्रभावी ठरत असल्यामुळे शासनमान्य यादीवरील तीन कलापथक संस्थाच्या माध्यमातून शासनाच्या शिवभोजन थाळी, ग्रामविकास, कृषी, स्वच्छ भारत अभियान, महाआवास, आदिवासी खावटी अनुदान योजना यासह विविध योजनांची कलापथकांद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी आमदार अभिजीत वंजारी, आमदार राजू कारेमोरे यांना देखील प्रसिध्दी अहवाल सादर करण्यात आला.