९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दृकश्राव्य माध्यमातून दिल्या शुभेच्छा
दृष्टी दान करता येते दृष्टीकोन नाही; दृष्टीकोन साहित्याच्या वाचनातून निर्माण झालेला असतो - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
लातूर : दृष्टी दान करता येते, पण दृष्टीकोन ( व्हिजन ) दान करता येत नाही. डोळे नष्ट करता येतात, पण डोळ्या मागचा विचार कोणी नष्ट करु शकत नाही. साहित्य, संगीत यातून माणूस समृद्ध होत असतो. त्यामुळे आपल्या मराठी भाषेचे वैभव अनन्य साधारण आहे. महाराष्ट्र आणि बंगाल या दोन संस्कृतीतले साहित्य आणि संगीत अत्यंत प्रगल्भ आहे. आपण ज्यावेळी महाराष्ट्र सोडून बाहेर जातो त्यावेळी आपली भाषा किती थोर आहे याची जाणीव होते असे हृद मनोगत केंद्रीय रस्ता विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला दृकश्राव्य माध्यमातून दिल्या शुभेच्छा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वनी चित्रफीतीद्वारे 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात रविवारी समारोप समारंभात रसिकांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या शुभसंदेशाची सुरुवात मराठी भाषेतून केली. संमेलन स्थळाला भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी नाव दिल्याबद्दल राष्ट्रपतींनी आयोजकांचे आभार मानले. त्याचबरोबर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी गेले ६० वर्षे शिक्षण देण्याचे काम करीत असल्याबद्दल आणि हिरक महोत्सवी वर्षानिमित सोसायटीच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.
उदयगिरी महाविद्यालयाची स्थापना शेतकरी आणि व्यापारी यांच्या आर्थिक योगदानातून करण्यात आली आहे. अशा लोकांच्या असामान्य योगदानातूनच समाज आणि राष्ट्र प्रगती करीत असतो. या योगदानाबद्दल महाविद्यालाच्या संस्थापक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.
मला याचा आनंद होत आहे, की हे साहित्य संमेलन भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात होत आहे. देशातील स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राने मोठे योगदान दिले आहे. संमलेनाच्या मुख्य सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे नाव देऊन आयोजकांनी एकप्रकारे सामाजिक समतेचा संदेशच दिला आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हीच परंपरा पुढे चालू ठेवली. समता आणि शौर्य ही महाराष्ट्राची ओळख आहे. प्राकृत आणि अपभ्रंशातून निर्माण झालेली मराठी भाषा ही जेवढी प्राचीन आहे तेवढीच समृद्ध आहे. अनेक मराठी संतांचे मराठी भाषेला मोठे योगदान आहे. त्यांनी तुकारामांचे अभंग वाचून दाखविले.
राष्ट्रपतींनी महाराष्ट्राच्या २२०० वर्षांपूर्वी असलेल्या सातवाहन राज्यातील राणी नागरीकाने दिलेल्या योगदानाची दखल घेत आतापर्यंत कर्तृत्व गाजविलेल्या महिलांच्या कार्याचा आढावा घेतला. सद्यस्थितीत इतर राज्यांच्या तुलनेत २०२१ जनगणनेनुसार महिलांचा जन्मदर आणि साक्षरता कमी असल्याचे नमूद करीत चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर या दोन विषयासंबंधी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन केले.
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी या साहित्य मंचावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, विधानसभेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, राज्यमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील,खा. सुधाकर शृंगारे, सौ. कांचनताई गडकरी , आ. संभाजीराव पाटील निलंगेकर,आ. अभिमन्यू पवार,आ. रमेशअप्पा कराड,माजी आमदार गोविंद केंद्रे, सुधाकर भालेराव, महामंडळाच्या नूतन अध्यक्षा उषा तांबे, जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, बापूराव राठोड, इतिहासकार गो.ब.देगलूरकर, महामंडळाचे कार्यवाह दादासाहेब गोरे,कोषाध्यक्ष रामचंद्र कालुंखे यांची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून आपल्याला मूलभूत अधिकार दिलेत त्यात अभिव्यक्ती आणि बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पण अभिव्यक्त होताना समाजाला, राष्ट्राला पोषक होईल असेच लिहावे, बोलावे असे विचार नितीन गडकरी यांनी मांडले. कोणीही शंभर टक्के परिपूर्ण नाही, उत्तम गुणवत्तेवर कोणाचे पेटेन्टही नाही ही सगळी प्रक्रिया शिक्षण आणि प्रबोधनातून घडते. त्यामुळे साहित्याचे योगदान मोठे आहे. येणारा काळ नॉलेजचा आहे, त्या नॉलेजचे रूपांतर संपत्तीत करण्याची संधी आपल्याकडे देश म्हणून आहे. आपल्या देशाचे युवक जगभर उत्तम संगणक अभियंते म्हणून नावाजले जात आहेत. अमेरिका, ब्रिटन सारख्या देशात मूळ भारतीय असलेल्या डॉक्टरांवर लोकांचा विश्वास वाढतो आहे. हे सगळे संस्कार आपल्या साहित्य संस्कृतीने त्यांना दिले असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
साहित्याचे व्यासपीठ हे राजकारणाच्या वरचे असून राष्ट्र घडविण्याचे सामर्थ्य साहित्यात असल्याची भावनाही गडकरी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने हे भव्य साहित्य संमेलन आयोजित केल्याबद्दल संस्थेचे कौतुक करून ग्रामपंचायत क्षेत्रात भरलेले हे आजपर्यंतच्या इतिहासातले पहिले साहित्य संमेलन असल्यामुळे संयोजकांनी हा साहित्याचा महामेळा उभा केल्याबद्दल अभिनंदन केले.
पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, हे साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर मध्ये झाले याचा आपल्याला खूप आनंद झाला. हे साहित्य संमेलन अतिशय उत्तम झाले, विषयांची निवड अत्यंत दर्जेदार होती, त्यामुळे संमेलन खूप ऐतिहासिक झाल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविली. या संमेलनात महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर चर्चाही महत्वाची ठरली असून केंद्रीय रस्ता विकास मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार आपण दोघांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न सुटू शकतो.
उदगीरचे आणि माझे ऋणानुबंध जुने असून उदगीरच्या विकासासाठी जे जे शक्य आहे ते सांगून उदगीरला जिल्हा करण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न करणार अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली.राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, उदगीर सारख्या शहरात असे साहित्य संमेलन घेऊन ते अत्यंत यशस्वी झाले. त्यामुळे हे साहित्य संमेलन ऐतिहासीक झाले.
यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके यांनी मनोगत व्यक्त केले.