ठाणे येथे बॅडमिंटनच्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन; मुंबई विभागातील एकमेव प्रशिक्षण केंद्र
ठाणे : खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणी खेळांडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया योजनेतून देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये 1000 खेलो इंडिया सेंटर्स सुरू करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाच्या प्रशिक्षणासाठी केंद्र सुरू करण्यात आले असून राज्यातील हे तिसरे तर मुंबई विभागातील एकमेव केंद्र असल्याचे जिल्हा क्रिडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी सांगितले.
प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सुदृढ आरोग्य आणि व्यक्तिमत्व खेळांतून विकसीत होते पर्यायाने समाज सुदृढ होतो त्यामुळे मुला-मुलींना खेळाची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.ठाणे बॅडमिंटन अकादमीचे संस्थापक श्रीकांत वाड यांनी देखील खेळांडूंना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पर्यटनमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी विजय बाविस्कर, ठाणे महापालिकेच्या क्रिडा उपायुक्त मीनल पलांडे यांच्यासह क्रिडा प्रशिक्षक, खेळाडू त्यांचे पालक उपस्थित होते. तालुका क्रिडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या प्रशिक्षण केंद्रासाठी 12 वर्षांच्या आतील मुला-मुलींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी 15 मुलं आणि मुलींचा समावेश आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बॅडमिंटन खेळामध्ये शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेत्या विघ्नेश देवळेकर यांची प्रशिक्षण म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण दादोजी कोंडदेव स्टेडिअम मधील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही सत्रात हे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना मोफत किट देखील देण्यात आले आहे.