“भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती”- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते.भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते.
आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाई गीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती. अभिजात भारतीय संगीत सुलभ करून लतादीदींनी ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले. आपल्या दैवी स्वरांनी त्यांनी असंख्य जनसामान्य, शेतकरी तसेच कष्टकरी लोकांना सकारात्मक जीवन जगण्याची नित्यनवी उमेद, ऊर्जा व उत्साह दिला.लतादीदी या तब्बल आठ दशके भारतीय चित्रपट सृष्टीची ओळख होत्या.
चित्रपट व संगीत सृष्टीच्या सुवर्ण काळातील साक्षात हिरकणी होत्या. भारतरत्न लतादीदी महाराष्ट्राच्या कन्या होत्या याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्या आपल्या जीवनकाळात झाल्या हे आपले सद्भाग्य होते.लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील.या दुःखद प्रसंगी संपूर्ण राज्याच्या वतीने लतादीदींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना आशाताई, उषाताई, मीनाताई, पं. हृदयनाथ तसेच संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना कळवतो.
लतादीदींच्या देशविदेशातील करोडो चाहत्यांना देखील आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.