पुणे जिल्ह्यातील जनावरांसाठी 25 मोबाइल व्हॅन
मावळ : जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात फिरते पशुचिकित्सालय (मोबाइल व्हॅन) वाहनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलीस ग्राउंड याठिकाणी करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे उपस्थित होते.
यावेळी मावळ तालुक्यातील पशुविस्तार अधिकारी डॉ. अनिल मगर यांच्याकडे गाडीची चावी सुपूर्द करण्यात आली.
पशुधन आजारी पडल्यास, अचानक विषबाधा झाल्यास किंवा एखादी आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होवू शकते किंवा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी पशुवैद्यकास घटनास्थळापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही, अशा वेळेस हे आजारी जनावर दवाखान्यापर्यंत उपचारासाठी घेवून येण्यासाठी पशुपालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. प्रसंगी वेळेत उपचाराअभावी जनावराचा मृत्यू होवून पशुपालकास मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.