पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते इनडोअर फायरिंग रेंज व बॉक्सींग विंगचे उद्घाटन
औरंगाबाद : पोलिस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) औरंगाबाद कार्यालयामार्फत नव्याने तयार करण्यात आलेल्या बॉक्सींग विंग व फायरिंग रेंज चे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या (ग्रामीण) आवारात उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अंबादास दानवे, विशेष पोलिस महानिरिक्षक मल्लीकार्जून प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण,जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक पवन बनसोड, बॉक्सींग आणि फायरिंग रेंज असोशिएशनचे पदाधिकार तसेच पोलिस अधिकारी, अमंलदार उपस्थित होते. यावेळी गडचिरोली येथे खडतर सेवा प्रदान केलेले पोलीस अधिकारी प्रदिप आवटे यांचा देसाई यांच्या हस्ते पदक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
देसाई म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामात कौशल्य प्राप्त करुन ते जतन केले पाहिजे. त्यामुळे आपल्या कामास गती मिळते. पोलिस विभागाला अधिक गतीमान करण्याचे शासनाचे ध्येय असून विभागासाठी वाहन, हत्यारे आदीमध्ये सुसज्ज असण्याबरोबर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी निधीची वेळोवेळी उपलब्धता करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या या बॉक्सींग विंग व फायरिंग रेंजच्या माध्यमातून पोलीसांना आपल्या कौशल्यात अद्यायावत राहण्यास मोठी मदत होणार आहे. या सुविधेचा पोलिस दलासोबत नागरिकांनाही वापर करण्याची संधी मिळाल्यास या क्षेत्रात उत्तम खेळाडू तयार होतील त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची सुचनाही देसाई यांनी संबंधितांना केली
हर्सुल येथील सुका कचरा वर्गीकरण; प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : हर्सुल येथील सुका कचरा वर्गीकरण प्रकल्पाचे आज जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करुन असे प्रकल्प भविष्यातील गरजेनुसार मोठ्या स्वरुपात राबविण्याची सुचना देसाई यांनी केली.
यावेळी आमदार अंबादास दानवे, महानगरपालिका आयुक्त आस्तीक कुमार पांडेय, महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख जोशी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.इकोसत्व आणि सीआरटी या कंपन्यांद्वारे महानगरपालिकेकडून गोळा झालेला सुका कचरा येथे स्वीकारल्या जाऊन त्याचे कचऱ्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण, बांधणी करुन संबंधीत रिसायकलींग करणाऱ्या कंपन्यांकडे पाठविले जाते. सध्या दहा टन सुका कचऱ्याचे वर्गीकरण येथे केले जाते.
पालकमंत्री देसाई यांनी यावेळी शहरातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाच्या बांधकामाचीही पाहणी करुन काम लवकरात लवकर पुर्ण करण्याची सुचना संबंधितांना केली. 14 एकरमध्ये असलेल्या या घनकचरा प्रकल्पात 150 मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती होणार असून सुका कचऱ्याचेही संकलन होणार असल्याची माहिती पांडेय यांनी यावेळी दिली.