दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मुल्यांना आणि विकासाला अंगीकारले आहे – राज्यमंत्री, राजेंद्र पाटील यड्रावकर
गडचिरोली : जिल्ह्यात दुर्गम भाग जास्त असल्याकारनाने विकासात्मक कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतू आता परिस्थिती बदलत आहे. दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मुल्यांना आणि विकासाला अंगीकारले आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी व्यक्त केले.
73 व्या प्रजासत्ताक दिनी जिल्हा मुख्यालयाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावेळी जनतेला संदेश देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले नक्षली विचारधारांना आता जिल्हयातून हद्दपार केले जात आहे. गेल्या वर्षभरात 49 नक्षलवाद्यांना सुरक्षा जवानांनी ठार केले, 20 नक्षलींना अटक केली. 08 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. जिल्हा प्रशासन व पोलीस विभागांतर्गत दुर्गम भागात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जात आहेत. सर्वसामान्यांना मदतीचा हात जिल्हा प्रशासनासह पोलीस या ठिकाणी चांगल्या प्रकारे देत आहेत असे ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
मजबूत देश, मजबूत राज्य निर्मितीमध्ये आपल्या गडचिरोली जिल्हयाचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हयातील वन संपदा, भौगोलिक रचना, बहुभाषिक जनता जणू काही संपुर्ण भारताचे एक मिनी मॉडेलच असल्याचे ते यावेळी म्हणाले. चुकीच्या विचारधारेला दूर ठेवत येथील दुर्गम भागातील नागरिक विविध शासकीय योजना आत्मसात करून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. रोजगार निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन वनोपज, नरेगा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आधुनिक शेती, शिक्षण, दळणवळणासाठी रस्ते आणि आरोग्य सुविधांमधून पाठबळ देत आहे.
यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संपुर्ण जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलं असे देशभक्त, आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमारेषेवर प्राणांचे बलिदान देणारे सैनिक आणि नक्षलवाद्यांचा मुकाबला करतना शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.
विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव
सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने जिल्हाधिकारी संजय मीणा यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण राज्यमंत्री यड्रावकर यांचे हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यपालन अधिकारी, कुमार आशीर्वाद यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला, जिल्हा शल्यचिकीत्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ. अनिल रुडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बन्सोडे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने उत्कृष्ठ कार्य केलेल्या कर्मचारी वर्गाचाही सन्मान यावेळी झाला.
पोलीस विभागातील राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीसांचा सत्कार
राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक विजेते पो.उप.नि.भरत चिंतामण नागरे, सहा.फौ. गोपाल मनिराम उसेंदी, पो.हवा. निलेश्र्वर देवाजी पदा, पो.हवा. संतोष विजय पोटावी, ना.पो.शी. दिवाकर केसरी नरोटे, ना.पो.शी. महेंद्र गणू कुलेटी, पो.शी. संजय गणपती बाकमवार, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस शौर्यपदक सहा.फौ.बस्तर लक्ष्मण मडावी यांना प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय मीणा यांचेहस्ते ध्वजारोहण
जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते आरोग्य विभागात उत्कृष्ठ काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले. तसेच महसूल विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे पाल्यांनी सन 2021 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी किंवा अन्य उच्च शिक्षणात 80 टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केल्या प्रित्यर्थ त्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून कु.प्राचिता देवेंद्र वाळके व कु. अंजली सुनिल राऊत यांना यावेळी प्रमाणपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.