मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : मराठीच्या जनजागृतीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेला ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’, हा लघुपट आजपासून मंत्रालय परिसरात दाखविण्यात येत आहे. याच ठिकाणी अभिजात मराठीची महती सांगणारे प्रदर्शन देखील भरविण्यात आले आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या दालनाचे आज उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलिंद गवादे, अवर सचिव अजय भोसले, उर्मिला धादवड आदी उपस्थित होते.
नुकतेच नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये हा लघुपट दाखविण्यात आला होता. त्यानंतर हिवाळी अधिवेशन काळात सर्व लोकप्रतिनिधींसाठी विधानभवन परिसरात हा लघुपट दाखविण्यात आला. आजपासून मंत्रालय परिसरातील अधिकारी आणि अभ्यागतांना या लघुपट व प्रदर्शनाचा लाभ घेता येईल.
राष्ट्रपतींना लिहा पत्र
मराठी भाषेला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा आहे. या विषयीची खात्री पटवून देण्यासाठी अनेक दाखले देणारे दालन आणि लघुपट बघितल्यानंतर इथे आलेल्या प्रत्येक मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तीला मा. राष्ट्रपतींना पत्र पाठवता येणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मा. राष्ट्रपतींना पत्र लिहून इथुनच पाठविण्यासाठी पत्रपेटीची सोय करण्यात आली आहे. आता पर्यंत लाखो मराठी भाषिंकांनी मा. राष्ट्रपतींना पत्र लिहून विनंती केली आहे.