मकरसंक्रातीला माऊलींचे मंदिर दर्शनासाठी बंद
आळंदी : मकरसंक्रातीनिमित्त माऊलींना ओवसा वाहण्यासाठी राज्यभरातून महिला येत असतात. या दिवशी मंदिर परिसर, इंद्रायणी घाट तसेच आळंदी शहरात प्रचंड गर्दी होत असते. राज्यात सध्या करोनाची तिसरी लाट सुरू आहे. करोनासह ओमायक्राॅनचा संसर्ग राज्यभर फैलावत आहे. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे शासनाबरोबरच आपणासर्वांचे कर्तव्य आहे.
त्यामुळे मकरसंक्रांत दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गुरूवार (दि. 13) रात्री 8 वाजतापासून ते शनिवार (दि.15) सकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर बंद असेल, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली आहे.
या कालावधीत श्रींचे नित्याचे उपचार आणि परंपरेने होणारे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात संपन्न होतील. भाविकांना देवस्थानच्या युट्यूब आणि फेसबुक पेजवरून थेट दर्शन घेता येईल. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख विश्वस्त देसाई यांनी केले आहे.
मकर संक्रांतीचे माऊली मंदिरातील कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/maulialandiweb