मंदिरातील दागिने चोरणाऱ्या दाम्पत्यासह मेहूणी अटकेत
राज्यातील 25 गुन्ह्यांचा छडा : बारामती पोलिसांची कारवाई
बारामती : पुण्यासह राज्यातील आठ जिल्ह्यांमधील 24 मंदिरातील देव-देवतांचे दागिने व इतर साहित्य चोरणाऱ्या पत्नीसह मेहुणीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एका चारचाकी वाहनासह 12 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शाहरूख राजू पठाण (वय 24, रा. गोपाळ शिरगाव, जि. कोल्हापूर, मूळगाव. शिव तकारवाडी, नीरा, ता. पुरंदर), पूजा मदनाळ (वय 19, रा. गोपाळ शिरगाव, जि. कोल्हापूर, मूळगाव. कुंभारी, जि. सोलापूर), अनिता गजाकोश (वय 19, रा. शिरगाव, कोल्हापूर, मूळगाव- विजापूर, कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील शिरसाई मंदिरातील देवीचे दागिने व साहित्य (दि. 8) जानेवारीला चोरीस गेल्याचा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
तालुका पोलिसांच्या पथकाने शिर्सुफळ, मळद, कुरकुंभ, दौंड, बारामती परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने गुन्ह्यातील वाहनाचा नंबर तपासण्यात अडचणी येत होत्या. पोलिसांनी वेगवेगळ्या बाजूने तपास करीत वाहनाचा नंबर मिळविला. वाहन मालकाशी संपर्क केला असता वाहन चोरीस गेल्याचे समजले. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे आणखी जिकीरीचे झाले. मात्र, तपास पथकाने तांत्रिक बाबींवरून गुन्ह्यातील आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथे असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (दि. 15) जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अटकेतील आरोपी शाहरुख पठाण हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी भोसरी, समर्थ, फरासखाना, पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस अमलदार नंदू जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक, अमोल नरुटे, मंगेश कांबळे, चालक बापू गावडे यांनी केली.