नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी ६०० कोटी – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) सन २०२१-२२ साठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या बाबी (शेततळी,ठिबक संच,फळबाग लागवड, इलेक्ट्रिक मोटर इ.) ,शेतकरी गटांना लाभ (शेतीसाठी सोयीसुविधा व कृषि प्रक्रिया उद्योग) तसेच पाण्याच्या ताळेबंदावर आधारित मृद व जलसंधारणाची कामे अशा विविध बाबींचा समावेश आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता बाह्य हिश्श्याचा रु.४२० कोटी व राज्य हिश्श्याचा रु.१८० कोटी असा एकूण ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येत आहे. हा निधी पोकरा ( हवामान अनुकूल कृषी विकास प्रकल्प ) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली असतील त्यांना तात्काळ वर्ग करावा, असे निर्देशही मंत्री भुसे यांनी दिले आहेत.
हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४ हजार २१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५ हजार १४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता सन २०२१-२२ मध्ये एकूण रु.७३०.५३ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून निधी खर्ची पडलेला आहे.
प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनी शेतकरी गट/कंपन्यांनी व ग्राम कृषी संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी द्यावयाच्या अर्थसहाय्यासाठी ३३ अर्थसहाय्य या उद्दिष्टाकरिता बाह्य हिस्सा व राज्य हिस्सा असा एकूण रु.६०० कोटी अतिरिक्त निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झाला आहे, अशी माहिती कृषिमंत्री भुसे यांनी दिली.