अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 62 वर्षीय व्यक्तीला दहा वर्षे सक्तमजुरी
पुणे : अल्पवयीन मुलीचे नग्न फोटो काढून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 62 वर्षांच्या आरोपीला दहा वर्ष तुरुंगवास आणि 5 हजार रूपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी सुनावली. विनोद हरिश काळे (खराडी रस्ता, चंदननगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना ऑगस्ट 2014 ते जानेवारी 2016 दरम्यान घडली.
पीडित अल्पवयीन मुलीने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी यामध्ये सात साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, वैद्यकीय अहवाल, जन्माचा दाखला आणि तपास अधिकाऱ्याची साक्ष महत्वाची ठरली. भावाच्या आग्रहावरुन खडकवासल्याला फिरायला जाताना फिर्यादीची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर मोबाईलवर संपर्क साधत मैत्री वाढवली.
कॉलेजची फी भरायची असल्याने मुलीने आरोपीकडे पैशांची मदत मागितली. त्याने मित्र मॉडेलिंगसाठी फोटो काढून त्या बदल्यात तुला पैसे देईल असे आमिष दाखविले. त्यांनी तिला डोणजे येथील लॉजवर नेऊन दारू पाजून नग्न फोटो काढले. तू माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या आई-वडिलांसह मित्र-मैत्रिणींना हे फोटो पाठवीन, अशी धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दोन वर्षे हा प्रकार सुरू होता, त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता त्याने हातावर ब्लेडने वार करून जखमी केले, असे पीडितेने फिर्यादीमध्ये म्हटले आहे.