जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास 5 वर्षे सक्तमजुरी
पुणे : लोखंडी फायटर तसेच फरशीच्या तुकड्याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास 5 वर्षे सक्तमजुरी आणि 75 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी सहा महिने कैद अशी शिक्षा भोगावी लागणार असल्याचे सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी आदेशात म्हटले आहे. दंड भरल्यास दंडा पैकी 50 हजार रूपये जखमीला देण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.
धनंजय शिवाजी मोरे (वय 41, रा. राजेंद्रनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विलास घोगरे घाटील व प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले. त्यांनी याप्रकरणात 12 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यामध्ये जखमी व्यक्ती आणि सोसायटीमधील प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्वाची ठरली.
आरोपी आणि जखमी फिर्यादी व्यक्ती एकाच भागात रहावयास असून, 25 एप्रिल 2015 रोजी फिर्यादी त्याची गाडी घेण्यासाठी आला असता आरोपी धनंजय मोरे याने त्याला शिवीगाळ करून लोखंडी फायटरने डोक्यावर व इतर ठिकाणी मारहाण केली. तसेच फरशीच्या तुकड्यानेही मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात आरोपीने मारहाण करण्यासाठी वापरलेले फायटर त्याने पंचासमक्ष पोलिसांकडे हजर केला होता. परंतु दोन्ही पंच साक्षीदार फितूर झाले. त्यावर सरकारी वकील अगरवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर करून न्यायालयाला विनंती केली की पंच साक्षीदार फितूर झाले तरीही तपास अधिकाऱ्यांची साक्ष त्याबाबत ग्राह्य धरण्यात यावी.
तसेच आरोपीने न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे खोटी असल्याचेही सरकारी वकिलांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दाखवून दिले त्यामुळे अगरवाल यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली.