दिवाळी फराळ
दीपावली जसा दिव्यांचा उत्सव, आनंदाचा उत्सव तसेच तो खाद्यपदार्थाचाही उत्सव आहे.
दीपावली जसा दिव्यांचा उत्सव, आनंदाचा उत्सव तसेच तो खाद्यपदार्थाचाही उत्सव आहे. हेमंत ऋतूची चाहूल घेऊन येणाऱ्या या सणाच्या काळात जिभेवर ताबा ठेवणे थोडे अवघड असते. परंतु योग्य काळजी घेऊन हे पदार्थ खाल्ले तर दिवाळीच्या दिवसांतही आरोग्य नक्कीच जपता येऊ शकते.
दिवाळी हा सण जणू हेमंत ऋतूच्या स्वागतासाठीच रचलेला आहे. शरीराचे बल वाढवून शक्ती वृद्धिंगत करणारा ऋतू म्हणजेच हेमंत ऋतू. या ऋतूंमध्ये शरीरस्थ अग्नी निसर्गत: वाढतो आणि शरीरधातूंचा अग्नीही वाढतो. यामुळे पचायला जड स्निग्ध पदार्थही पचवले जाऊन शरीरातील धातूंचे उत्तम पोषण केले जाते. म्हणूनच या ऋतूमध्येच दिवाळी सण साजरा केला जात असावा.
दिवाळीत घराघरांत केल्या जाणाऱ्या गोडाधोडाच्या, तिखटाच्या पदार्थामध्ये दूध, तूप, साखर, उडीद, गव्हाचं पीठ आदींचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत. दीपावलीच्या पदार्थामध्ये प्रामुख्याने लाडू, करंज्या, घारगे, अपूप (अनारसे), चाणकपुरिका (तिखट पुऱ्या), फेणिकांचे प्रकार केले जात असल्याचा उल्लेख आयुर्वेदांच्या ग्रंथांमध्येदेखील आढळतो.
हेमंत ऋतूमध्ये वातावरणातील गारवा वाढतो आणि भूक अधिक लागते. उल्हासदायक बाह्य़ वातावरणामुळे मनदेखील प्रसन्न असल्याने दिवसभरात काम करण्याची ऊर्जादेखील वाढते. यात पचनक्षमताही वाढलेली असल्याने पचायला जड असे स्निग्ध पदार्थाचे पचन होण्यास अनुकूल शारीरिक रचना असते. आयुर्वेदच्या शास्त्रामध्येही विविध प्रकारच्या खीर, फळे आदी गोड पदार्थाचे या काळात सेवन केल्याचे नमूद केले आहे.
दिवाळीच्या फराळातील पदार्थ पचवण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि शरीरामध्ये निर्माण होणारा वात कमी करण्यासाठी डाळींचे सूप उत्तम उपाय आहे. मूग, मसूर, उडीद दळून त्यांची डाळ तयार करून सूप घेणे फायदेशीर ठरते. केवळ डाळींचे सूप मलावष्टंभ करणारे ठरते. तेव्हा डाळी भाजून नंतर दळून त्यांचे सूप केल्यास योग्य! त्यातही डाळ भाजून त्याची साल काढल्यावर ती पचायला अधिकच हलकी होते. कफवात, खोकला, श्वास तसेच कफवातजन्य व्याधी कमी करणारे ठरते. थंडीच्या दिवसात बऱ्याच वेळा तेलकट, जड पदार्थ सेवन करून वात व कफ वाढतो. त्यासाठी हे सूप अत्यंत गुणकारी आहे.
आख्खे धान्य घेतल्यास किमान रात्रभर म्हणजे साधारण १२ तास भिजत ठेवावेत. त्यानंतर भरडून तूप, हळद, दही लावून दडपून ठेवावीत आणि उन्हात वाळवून, कांडून त्याची डाळ करावी. अशा तऱ्हेने डाळ तयार केल्यास त्याचे पदार्थ अधिक रुचकर, खुसखुशीत, चवदार आणि पचावयास हलके असतात. डाळी घेतल्यास त्या भिजवून त्यांचे सूप करावे.
सर्वच प्रकारचे सूप हे अग्नी वाढवणारे व पाचक असले तरी ते अतिप्रमाणात सेवन केल्यास आणि शिळे झाल्यास पित्त वाढवणारे ठरते हे लक्षात असू द्यावे. सूपचे गुणधर्म वापरलेल्या पदार्थानुसार बदलतात. पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या आणि फळभाज्यांपेक्षा धान्यांचे सूप अधिक उपयोगी ठरते. त्यातही धान्यांमध्ये मुगाचे सूप अत्यंत पथ्यकर व चवदार ठरते. मुगाची डाळ पाण्यात भिजवून नंतर शिजवून तूप, हिंग, जिरे, बडीशोप, मीठ घालून, घोटून त्यात काही प्रमाणात फळभाज्या, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, कांदा घालावा. उकळी आणून त्यात इतर कोणताही द्रवपदार्थ (सॉस वगैरे) न टाकता सेवन करावे. हे सूप पचायला अत्यंत हलके, भूक वाढवणारे, वात कमी करणारे, शरीराचा थकवा दूर करणारे तसेच पित्त, उलटी, जुलाब या व्याधींमध्ये विशेष उपयुक्त आहे. हे सूप गरोदर महिला, बाल, वृद्ध, तसेच जडत्व असलेल्या व्यक्तींनी आवर्जून घ्यावे.
फराळ खाताना घ्यावयाची काळजी
दिवाळीमध्ये खाऊच नये असे पदार्थ नसले तरी त्या त्या व्यक्तीच्या शरीर प्रकृती वा विरुतीप्रमाणे आहार घेतल्यास त्रास होण्याचा संभव कमी असतो. मधुमेहाच्या रुग्णांनी गोडाचा मोह आवरणे गरजेचे आहे, तसेच श्वासाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तेलकट, जड गोड पदार्थ खाल्ल्यास त्यावर गरम पाणी घ्यावे. सुंठ, दालचिनीचा वापर आहारात अधिक असावा. थंड पदार्थ, थंड जेवण तसेच शिळे अन्न टाळावे. गरोदर महिलांनी कडू, अधिक आंबट पदार्थ या काळात खाणे टाळावे. थंडीमध्ये सांध्यांचा त्रास होणार नाही याची आठवण ठेवून अतितुरट, अतितिखट, कडू पदार्थ टाळावे. या दिवसात गारवा असल्याने व वाताचा काल असल्याने थंड पाणी वा थंड पेयांचे सेवन करू नये. रात्री थंड पाणी, बर्फाचे पाणी घेतल्यास वाताचा, कफाचा त्रास संभवतो. गरम, ताजे अन्नपदार्थ दिवाळीत सेवन केल्यास संपूर्ण वर्षांची प्रतीकारक्षमता शरीरामध्ये निर्माण होते. तेव्हा फराळासोबतच संतुलित आणि सकस जेवण करणेही आवश्यक आहे.