लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा २४ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात संपन्न
अलिबाग : लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा 24 वा दीक्षान्त समारंभ आज अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली चे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक प्रा.डॉ.विवेक साठे,कार्यकारी परिषदेचे सदस्य प्राचार्य नागेश आलुरकर, प्रा.एस. एल. नलबलवार, प्राचार्य व्ही. के. रेदासनी, प्राचार्य उल्हास शिंदे, प्राचार्य राहुल बारजिभे, प्राचार्य अभिजीत वाडेकर, प्राचार्य किशोर ओतारी, प्राचार्य नरेंद्र कान्हे, डॉ. एम.डी.लड्डा, डॉ. विवेक वाडके, श्रीनिवास बेंडखळे, राजेश पेडणेकर, प्राचार्य दिनकर घेवाडे, डॉ. अमित शेष, विद्यापीठातील इतर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी दीक्षान्त समारंभास उपस्थित विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करताना राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी संपूर्ण जग विविध क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. “आत्मनिर्भर भारत” बनविण्यात तांत्रिक विभागाचा मोठा सहभाग असून तांत्रिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नवनवीन संकल्पनांचा शोध लावून देश घडवतील, असा विश्वास व्यक्त करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.